Latest

Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्याचा प्रचार आज थंडावणार

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) राज्यातील चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघांत १३ मे रोजी मतदान होणार असल्याने या मतदारसंघांतील प्रचार तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील काही मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे.

या चौथ्या टप्प्यात (Lok Sabha Election 2024) नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी नंदुरबार हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी, तर शिर्डी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रचार सभा घेतलेल्या नंदूरबारमध्ये भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांच्या विरोधात काँग्रेसचे गोवाल पाडवी हे मैदानात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनीही शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात प्रचारसभांना संबोधित केले. या मतदारसंघात एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, महायुतीचे संदिपान भुमरे व महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यात मुख्य लढत आहे. अहमदनगरमधील भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात लढत आहे. जळगाव येथे भाजपच्या स्मिता वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात तर रावेर येथे भाजपच्या रक्षा खडसे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत आहे. शिर्डीत शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांच्यात तिरंगी लढत आहे.

पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत प्रचार थंडावणार

पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे व शिरूर या मतदारसंघांतही प्रचार थंडावणार आहे. मावळ येथे शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात लढत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. शिरूर येथे दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने असून अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार व शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे रिंगणात आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT