Latest

Lok Sabha Election 2024 | भुजबळांच्या माघारीनंतर ‘ओबीसी’ एकवटले

अंजली राऊत


लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता राज्यातील सर्व ओबीसी एकवटणार असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात ओबीसी समाज निवेदन देऊन भुजबळांना या निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे समोर आले आहे. मतांच्या गोळाबेरजेसाठी भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याचा वापर केला गेला असल्याने ओबीसी समाज संतप्त झाला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर नाशिकमधून उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर अजित पवार गटाची सुरुवातीला कोठेही चर्चा नव्हती. सर्वप्रथम शिंदे गटाच्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव नाशिक मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले होते. त्याबाबत कोणाला विश्वासात न घेता नाव जाहीर केल्याने जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. भुजबळांनी तर श्रीकांत शिंदे हे नाव जाहीर करणारे कोण असा खडा सवाल उपस्थित केला होता, तर भाजपच्या पदाधिकारी हे गोडसेंना उमेदवारी नको यासाठी वरिष्ठांकडे ठाण मांडून बसले होते.

मात्र, अचानक दिल्लीवरुन भुजबळांचे नाव नाशिकसाठी आले असल्याची माहिती समोर आल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर मनोज जरांगे तसेच इतर काही मराठा नेत्यांनी भुजबळांच्या उमेदवारीबाबत भाष्य करत त्यांच्याविरोधात सभा घेण्याचे जाहीररीत्या सांगितले होते. तसेच त्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या मुंबईवाऱ्या सुरु झाल्या होत्या.

अशातच शुक्रवार (दि. १९) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांनी जाहीर केल्याप्रमाणे, नावाची चर्चा सुरू करून तीन आठवडे उलटले. मात्र अद्याप नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याचे खंत व्यक्त केली. लवकरात लवकर महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यासाठी मी माघार घेत असल्याचे जाहीरपणे सांगितले. यावर जिल्ह्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांनी एकत्र येत या निर्णयाचा विरोध सुरू केला आहे. दिल्लीतून नावावर शिक्कामोर्तब होते. मात्र, राज्यात नाव जाहीर करण्यास विलंब केला जातो हा एक प्रकारे अवमानच असल्याचा संदेश राज्यात ओबीसींमध्ये पोहोचायला लागला. त्यामुळे ओबीसींच्या वतीने निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्यासाठी पावले उचलायला हवीत, अशी तीव्र भावना ओबीसी समाजात पसरली असल्याचे समोर आले आहे

छगन भुजबळांसारख्या ओबीसी नेत्याला दिल्लीतून उमेदवारी जाहीर झाली, मात्र राज्य नेतृत्वाने अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केले नाही. तसेच भुजबळांसारखा नेता खासदार होऊन संसदेत जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे पोटतिडकीने ओबीसींचे प्रश्न सुटतील. त्यांच्या या निर्णयाविरोधात आम्ही निवेदन देणार आहोत आणि या निवडणुकीत ओबीसींची निर्णायक भूमिका घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. – बाळासाहेब कर्डक, उपाध्यक्ष, समता परिषद.

राज्यभरातील ओबीसी नेत्यांमध्ये संतापाची भावना
छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर राज्यभरातील ओबीसी नेत्यांनी एकत्र येत मेळावे, बैठका घेण्यास सुरुवात केली असून, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे बैठका झाल्या आहेत. त्यात भुजबळांना निर्णायक भूमिका घेण्याची विनंती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित असताना त्यांना मुद्दाम डावलले जात असल्याची संतापजनक भावना या नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT