Latest

वेध लोकसभेचे : १९७१ ला राज्यात शिवसेनेचे पाच उमेदवार, लातूर, धाराशिवला काँग्रेस उमेदवारांची हॅटट्रिक

स्वालिया न. शिकलगार

१९७१ ची लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीने नोंद घेण्यासारखी आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या स्वतंत्र निवडणुका, पाच शिवसेना उमेदवारांचे नामांकन, प्रा. मधू दंडवते यांचा विजय, काँग्रेसला ५२१ पैकी ३५२ जागा या बाबी लक्षात ठेवण्या सारख्या आहेत.  या निवडणुकीत लातूर राखीव आणि धाराशिव मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सलग तिसर्‍यांदा विजयी झाले. लातुरात काँग्रेसचे तुळशीराम कांबळे यांनी बाजी मारली. त्यांनी संयुक्‍त समाजवादी पक्षाचे उमेदवार तुकाराम शिनगारे यांचा ९१ हजार मतांनी पराभव केला. कांबळे यांना १,५६,७७१ तर शिनगारे यांना ६५,२७७ मते मिळाली. उर्वरित तीन उमेदवार अपक्ष होते. कांबळे यांना टक्‍कर देणारा उमेदवार हा संयुक्‍त समाजवादी पक्षाचा होता. या पक्षाचे मराठवाड्यातील काही भागात काम होते. प्रजा समाजवादी आणि समाजवादी पक्ष या दोन्ही पक्षांच्या १९६४ मध्ये झालेल्या विलिनीकरणातून नवीन पक्षाची स्थापना झाली होते.

जॉर्ज फर्नांडीससारखे नेते या पक्षात काम करीत होते. वडाचे झाड हे या पक्षाचे चिन्ह होते. अर्थात कांबळे यांची लोकसभेत जाण्याची तिसरी वेळ होती. १९६२, ६७ या दोन्ही निवडणुकांत ते विजयी झाले होते. या निवडणुकांत त्यांनी आरपीआय उमेदवाराचा पराभव केला होता. कांबळे हे मुक्‍ती लढ्यातही सक्रिय राहिले होते. हैदराबाद स्टेट आणि महाराष्ट्र विधानभेचे ते सदस्य होते. संभाजीनगर येथे विद्यापीठाची स्थापना व्हावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात असताना उचलून धरली होती. सुरगमय संत संमेलन, अस्पृश्यता, वैधानिक अधिकारी, हमारी आझादी आणि धरम के नाम पर ही पुस्तकेही त्यांनी लिहिली.

कांबळे यांच्याप्रमाणेच धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसचे तुळशीराम पाटील यांनी हॅट्ट्रिक मारली. पाटील यांनी शेकाप नेते उद्धवराव पाटील (१९६२, शेकाप), एच. एन. सोनुले (१९६७, आरपीआय) आणि बलभीमराव देशमुख (१९७१, शेकाप) यांचा पराभव केल्याची नोंद आहे. पाटील हे उमरगा तालुक्यातील गुंजोटीचे रहिवासी. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुक्ती लढ्यातही भाग घेतला होता. तेरणा सहकारी कारखान्याच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. लोकसभेत असताना सार्वजनिक उपक्रम समितीचे ते सदस्य होते.

एकत्रित निवडणूक पद्धत संपुष्टात

मोदी सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची वन नेशन वन इलेक्शनसाठी समिती नियुक्‍त केली आहे. ही पद्धत आपल्या देशात यापूर्वीही अस्तित्वात होती. १९५२ ते ६७ पर्यंत दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या जात असत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९७१ ची पहिली निवडणूक अशी होती की, लोकसभा निवडणुका प्रथमच स्वतंत्रपणे झाल्या. त्यास इंदिरा गांधी यांच्याविरोधात असणारा पक्षातंर्गत असंतोष कारणीभूत ठरला. काँग्रेसमध्ये सिंडिकेट, इंडिकेट असे दोन गट तयार झाले. त्यातून आपल्याला निर्माण होणारा धोका लक्षात घेत इंदिरा गांधी यांनी वर्षभर अगोदर मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या. काही नवीन राज्यांचे पुनर्गठन हे कारण त्यावेळी त्यांनी पुढे केले होते, हा भाग वेगळा.

शिवसेना प्रथमच रिंगणात

७१ च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेने पाच जागांवर आपले उमेदवाद उभे केले होते. (निवडणूक आयोगाची अधिकृत पक्ष म्हणून मान्यता नव्हती.) मनोहर जोशी (मुंबई मध्य), सतीश प्रधान (मुंबई मध्य, दक्षिण), देवीदास शार्दूल (धुळे, तिसर्‍या क्रमांकावर), अनिल बिर्जे (रत्नागिरी, तिसर्‍या क्रमांकावर), भगवंत घाटे (पुणे, चौथ्या क्रमांकावर) हे पाच उमेदवार रिंगणात होते. मुंबईत दुसर्‍या क्रमांकावर असणारी लोकसभा ही काही काळातच मुंबईकरांचे हृदय झाली, हे सांगणे नकोच.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT