Latest

भावना गवळी, हेमंत पाटलांचा पत्ता कट; शिंदे शिवसेनेला धक्का

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाच्या सलग पाचवेळा निवडून आलेल्या खासदार भावना गवळी यांचा लोकसभेचा पत्ता अखेर कट करण्यात आला आहे; तर हिंगोलीमधून स्थानिक भाजपने केलेल्या टोकाच्या विरोधामुळे हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्यावर ओढवली आहे. हिंगोलीमध्ये नांदेडचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम-कोहळीकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनाही तिकीट देण्यास भाजपने प्रचंड विरोध केल्याने हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळ मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

भाजपने शिवसेनेच्या काही उमेदवारांना कडाडून विरोध केल्याने जागावाटप रखडले आहे. हिंगोलीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करूनही भाजपच्या स्थानिक आमदारांनी आणि पदाधिकार्‍यांनी कडाडून विरोध केला. तसेच भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप पाहता त्यांनाही उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध होता. आपली उमेदवारी वाचविण्यासाठी हेमंत पाटील आणि भावना गवळी यांनी अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. दोघांनी आम्ही आपल्या अडचणीच्या काळात सोबत आल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारीचा आग्रह धरला होता. हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर ठिय्या देत पाटील यांना तिकीट देण्याची मागणी केली. मात्र, दोघांचीही तिकिटे भाजपच्या दबावामुळे कापण्यात आली आहेत.

हिंगोली आणि वाशिम-यवतमाळ मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी अखेरचा दिवस असताना दोघांचे पत्ते कापण्यात आले. हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्याऐवजी शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख बाबुराव कदम-कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत; तर वाशिम-यवतमाळमधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे.

आपले तिकीट कापले जाणार, याची कुणकुण भावना गवळी यांना आधीच लागली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत होत्या. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी नागपूरमध्ये थेट देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन तिकिटासाठी विनवणी केली. बुधवारी त्या मुंबईत दिवसभर ठाण मांडून बसल्या होत्या; पण त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.

गोडसे, धैर्यशील मानेंचे काय होणार?

हेमंत पाटील, भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यानंतर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचे काय होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. धैर्यशील माने यांच्या उमेदवारीलाही भाजपने विरोध केल्याने नव्या नावाचा विचार एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. धैर्यशील माने यांच्या जागेवर त्यांच्या आई निवेदिता माने यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे; तर हेमंत गोडसे यांची नाशिकची जागा ही अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच गोडसे यांनी वारंवार शक्तिप्रदर्शन करूनही त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

SCROLL FOR NEXT