Latest

जेजुरी देवसंस्थानचा कारभार ‘रामभरोसे’

अमृता चौगुले

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : जेजुरीच्या खंडोबा मंदिरात राज्य शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत विकासकामे सुरू असल्याने देवसंस्थानच्या वतीने मुख्य गाभारा देवदर्शनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, देवसंस्थानचे विश्वस्त, त्यांचा परिवार व नातेवाईक आणि व्हीआयपी यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. स्थानिक नागरिक व भाविकांना गाभार्‍यात प्रवेश दिला जात नाही. असा दुजाभाव कशासाठी?, जेजुरी देवसंस्थानचा कारभार मरामभरोसेफ झाला असल्याचा आरोप जेजुरीचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते हेमंत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला. सोनवणे यांनी सांगितले की, श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने ग्रामस्थांशी बैठक घेऊन मुख्य गाभारा व सभामंडपात कामे सुरू करण्यात येणार असून 5 ऑक्टोंबरपर्यंत गाभारा दर्शनसाठी सर्वांसाठी बंद राहील असे जाहीर केले होते.

ग्रामस्थांनी या निर्णयाला सहकार्य केले. गाभारा दर्शनसाठी बंद केल्याने भाविकांची संख्या प्रचंड घटली. जेजुरी शहरातील व्यवसायधंदे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा परिणाम जेजुरी शहराच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत गाभारा व सभामंडपाचे काम पूर्ण झाले नाही. आजही हे काम सुरू आहे. काम सुरू असताना जेजुरी देवसंस्थानचे विश्वस्त, त्यांचा परिवार, नातेवाईक तसेच व्हीआयपी व्यक्तींना थेट मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिले जात आहे. काही विश्वस्त, नातेवाईक व व्हीआयपींनी गाभार्‍यात दर्शन घेतल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत, तर जेजुरीकर नागरिक व भाविकांना गाभार्‍यात प्रवेश दिला जात नाही. असा दुजाभाव कशासाठी केला जातो?फ असा सवाल हेमंत सोनवणे यांनी केला आहे. मगडावर विकासकामे सुरू असताना नुकतेच एका टीव्ही चॅनेलवरील मालिकेचे गडावर चित्रीकरण झाले. ही परवानगी कुणी दिली? स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे,फ असा आरोप या वेळी करण्यात आला.

मंदिरात विकासकामे सुरू झाल्यानंतर कोणाकोणाला प्रवेश दिला, याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देवसंस्थानकडे मागण्यात आले; मात्र ते देण्यात देवसंस्थान टाळाटाळ करीत आहे. बाहेरील विश्वस्त केवळ मासिक बैठकीला व पेटी उघडण्यासाठी येतात. त्यांच्या गैरहजेरीत कर्मचार्‍यांवर नियंत्रण राहत नाही. देवसंस्थानचा कारभार बेभरवशाचा झाला आहे. जेजुरीगडावरील तेल ठेका ठेकेदाराने मुदतीच्या आत सोडला आहे. सध्या देवसंस्थान तेल विक्री करीत आहे. या विक्रीवर देवसंस्थानचे नियंत्रण आहे का? असा प्रश्न उपस्थित करत असून, आपण धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे याबाबत तक्रार केली असल्याचे हेमंत सोनवणे यांनी सांगितले. मागील काळात चार विश्वस्त स्थानिक होते, त्यांचे कर्मचारी वर्गावर नियंत्रण होते. सध्या सातपैकी केवळ एक विश्वस्त स्थानिक आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गावर नियंत्रण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

गाभार्‍यातील व सभामंडपातील कामे लवकर पूर्ण करावीत, सध्या गडावर घटस्थापनेचा उत्सव सुरू असून, दररोज सकाळी व सायंकाळी एक तास स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी गाभार्‍यात प्रवेश द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने हेमंत सोनवणे यांनी केली आहे.

पाचव्या माळेपासून गाभारा होणार खुला : प्रमुख विश्वस्त
याबाबत देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे यांनी सांगितले की, जेजुरीगडावरील मुख्य मंदिरात पुरातत्व विभागाच्या वतीने डागडुजीचे काम सुरू असून घटस्थापनेच्या पाचव्या माळेपासून नागरिक व भाविकांना गाभारा दर्शनासाठी खुला केला जाणार आहे. तसेच तेल निविदा सध्या देवसंस्थान योग्य ती दखल घेऊन चालवीत आहे. लवकरच विश्वस्त मंडळाची बैठक घेऊन या तेल विक्रीची निविदा काढणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT