Latest

kolhapur north result live Update : कोल्हापूर उत्तर विधानसभेचा ‘उत्तरा’धिकारी कोण होणार ?

backup backup

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कुणाचा गुलाल उधळणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरचा 'उत्तरा'धिकारी कोण याचा फैसला आज (दि.१६) शनिवारी दुपारी १२ पर्यंत होणार आहे. राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार्‍या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात चुरस आहे. १५ उमेदवार रिंगणात आहेत.

सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे, त्यानंतरच्या पुढच्या दोन-अडीच तासांतच निवडणुकीचा नेमका कल स्पष्ट होईल. दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यातून आरोप-प्रत्यारोप आणि त्यामुळे टोकाला गेलेली ईर्ष्या यातून निवडणुकीत चुरस निर्माण झाली. मात्र ती चुरस मतदानात फारशी दिसली नाही. पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १२) ६१.१९ टक्के मतदान झाले.

आठ वाजता मतमोजणी सुरू होताच पहिल्यांदा टपाली मतदान मोजले जाईल. यानंतर १४ टेबलवर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू होईल. कसबा बावड्यातील मतदान केंद्रापासून मतमोजणीची सुरुवात होणार आहे. शास्त्रीनगर परिसरातील बुद्धगार्डन येथील मतदान केंद्रांची शेवटच्या फेरीत शेवटच्या टेबलवर मतमोजणी होईल. मतमोजणीच्या एकूण २६ फेर्‍या होतील.

यानंतर उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठ्या काढून पाच ईव्हीएम निवडले जातील आणि त्या मशिनच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत.

व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठीही विशेष तयारी करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी टेबलवर ४५ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह राखीव आणि अन्य असे एकूण १२५ कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT