पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : Liquor Policy Scam : बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात नाव आलेल्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सीबीआयकडे चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प बनविण्याचे काम सुरू असून आपण त्यात व्यस्त आहोत, त्यामुळे पुढील वेळ निश्चित करावा, असे सिसोदिया यांनी सीबीआयला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मद्य धोरण घोटाळा प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी सीबीआयने सिसोदिया यांना आज, रविवारचा वेळ दिला होता. सीबीआयने सदर प्रकरणात तीन महिन्यांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. उपमुख्यमंत्री असलेले सिसोदिया हे दिल्लीचे अर्थमंत्री देखील आहेत. सध्या दिल्लीचा अर्थसंकल्प बनविण्याचे काम सुरू असून आपण त्यात व्यस्त आहोत, असे सिसोदिया यांनी तपास संस्थेला सांगितले आहे. साधारणतः एका आठवड्यानंतर म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटी चौकशीसाठी आपण उपलब्ध होऊ, असेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.