Latest

Messi Emotional Post : मेस्सीची नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भावनिक पोस्ट , म्हणाला…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Messi Emotional Post : अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीसाठी 2022 हे वर्ष स्वप्नपूर्तीचे ठरले. त्याने अर्जेंटिनाला तब्बल 36 वर्षांनी विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मेस्सीने जेव्हा विश्वचषक उंचावला तेव्हा जगभरातील चाहत्यांनी आपल्या लाडक्या फुटबॉलपटूसाठी आनंदोत्सव साजरा केला. त्या अविश्वसनीय पाठिंब्याबद्दल मेस्सीने कृतज्ञता व्यक्त करत नवीन वर्षाच्या खास शुभेच्छा दिल्या असून चाहते आणि मित्रांचे आभार मानले आहेत. त्याने सोशल मीडीयावर एक भावनिक पोस्ट केली आहे.

मेस्सी म्हणातो, '2022 हे वर्ष संपले आहे जे मी कधीही विसरणार नाही. मी नेहमी ज्या स्वप्नाचा पाठलाग केला ते अखेर पूर्ण झाले. महत्त्वाचे म्हणजे विश्वचषक जिंकण्याची अद्वितीय घटना मी माझ्या अद्भुत कुटुंबासह आणि मित्रांसोबत शेअर करू शकलो. माझ्या चाहत्यांनी मला कधीही निराश होऊ दिले नाही. ते नेहमीच माझ्या पाठिशी ठाम उभे राहिले. (Messi Emotional Post)

मेस्सीला जगभरातून प्रचंड पाठिंबा मिळत असतो. भारतातही त्याचे लाखो चाहते आहेत. अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला तेव्हा द. अमेरिका खंडात जल्लोष झाला. तसेच मेस्सी अर्जेंटिना, पॅरिस आणि स्पेनच्या बार्सिलोना येथील ज्या-ज्या क्लबशी जोडला गेला होता त्या-त्या संघांच्या समर्थकांनी या स्टार खेळाडूच्या नावाचा जयघोष केला. या सर्वांचे मेस्सीने आभार मानले आहेत.

मेस्सी पुढे म्हणाला, "ज्यांनी मला फॉलो केले आणि पाठिंबा दिला त्या लोकांसाठी मी नेहमीच खास आठवणी देऊ इच्छितो. ते माझे कर्तव्य आहे असेही मी मानतो. माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणे अतुलनीय आहे. पॅरिस, बार्सिलोना आणि इतर देशांतील शहरांमधील अनेक लोकांनी माझ्यावर जिवापाड प्रेम केले. त्यांचा मी ऋणी आहे. मला आशा आहे की हे वर्ष सर्वांसाठी चांगले असेल आणि मी प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि शक्तीसाठी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना मिठी मारून, 2023 च्या मन:पूर्वक शुभेच्छा.' (Messi Emotional Post)

सध्या तरी मेस्सीने अर्जेंटिनाकडून खेळण्याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य दिलेले नाही. तो आपला शेवटचा विश्वचषक खेळला आहे हे निश्चित पण कतारमधील अंतिम विजयानंतर तो म्हणाला की अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये सामने खेळण्यासाठी तो अजूनही उत्सुक आहे.

SCROLL FOR NEXT