Latest

‘हर घर तिरंगा’! राष्ट्रध्वजासह सेल्फी अपलोड करा, पंतप्रधान मोदींचे आवाहन

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) ही मोहीम राबविण्यात येत आहे. या वर्षी आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना 'हर घर तिरंगा' चळवळीला बळ देऊ या. त्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तुमच्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा. या चळवळीमुळे राष्ट्रध्वजाशी आपले नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत व्यक्त केला आहे.

'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी एक वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे ज्यावर राष्ट्रध्वजासह सेल्फी अपलोड करता येतो. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 'हर घर तिरंगा' वेब पोर्टलची https://harghartiranga.com/ लिंक शेअर केली आहे. तसेच त्यांनी यानिमित्ताने राष्ट्रध्वजाशी संबंधित काही ऐतिहासिक दस्तावेज ट्विटरवर शेअर केले आहेत. आज २२ जुलैला आपल्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. याच दिवशी १९४७ मध्ये आपला राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला होता. आपल्या तिरंग्याशी संबंधित समिती आणि पंडित नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याच्या तपशिलांसह इतिहासातील काही महत्वाची माहिती पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी शेअर केली आहे.

वसाहतवादाशी लढताना ज्यांनी स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिले त्या सर्वांचे अतुलनीय धैर्य आणि प्रयत्न आज आम्ही आठवतो. त्यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे मोदी यांनी पुढे म्हटले आहे.

हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, दानशूर व्यक्ती, नागरिकांनी आपले घर, आस्थापनांवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये जनतेने सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासकीय स्तरावरुन करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT