Latest

टाकळी हाजी परिसरात बिबट्याची दहशत; आणखी एका मेंढी, गाईचा पाडला फडशा

अमृता चौगुले

टाकळी हाजी(ता. शिरूर); वृत्तसेवा : पश्चिमपट्ट्यातील गावांमध्ये बिबट्यांची संख्या वाढत चालली असून, पशुधन धोक्यात आले आहे. कुत्रे, कोंबड्या, गायी, वासरे, शेळ्या, मेंढ्या यांच्यावर हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या असून, मानवीवस्तीत प्रवेश करून गोठ्यातील जनावरांवर हल्ले होत आहेत. परिणामी, या भागात बिबट्याची दहशत कायम आहे.

टाकळी हाजी येथील गाडीलगाव रस्त्यावर गुरुवारी (दि. 29) रात्री सव्वानऊ वाजता नानाभाऊ शिंदे यांच्या वाघुरीची दोरी तोडून बिबट्याने एक मेंढी ठार केली. शिंदे कुटुंब त्या वेळी जेवण करत होते. शेतामध्ये मेंढ्यांचा कळप असताना बिबट्याने अचानक केलेला हल्ला पाहून शिंदे कुटुंब भयभीत झाले. शेतात राहणार्‍या धनगर समाजातील मेंढपाळांची या बिबट्याच्या दहशतीने झोप उडाली आहे.

यासोबतच माळवाडी रस्त्यावरील घोडेवस्ती येथील पंकज गावडे यांच्या दुभत्या गाईवर गुरुवारीच पहाटे साडेचारच्या दरम्यान झालेल्या हल्ल्यात गाय ठार झाली. पंकज गावडे यांची गाय घराशेजारील गोठ्यात बांधलेली होती. गाईचा आवाज आल्याने शेजारी असलेले भाऊसाहेब घोडे यांनी दरवाजा उघडला, तर समोर बिबट्याने गाईवर हल्ला करून गाय ठार केली होती. बिबट्याला पाहून भाऊसाहेब यांनी आरडाओरडा केला. परंतु, बिबट्या तेथून अगदी सावकाशपणे चालत निघून गेला.

मनुष्याला स्वत: घ्यावी लागते काळजी
बिबट्यांना मनुष्याची कोणतीही भीती वाटत नसल्यामुळे बिबट्यांचा वावर मनुष्यवस्तीत आढळून येत आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाले असून, रात्रीच्या वेळी शेताला पाणी देणे किंवा घराबाहेर येताना नागरिकांना स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे.

जीवितहानी होण्याची वाट बघत आहात काय?
आठवडाभरापूर्र्वीच माळवाडी येथे एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता, त्यामुळे काहीसे भय कमी झाल्यासारखे वाटत असले, तरी एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाल्यामुळे या भागात बिबट्यांची दहशत कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत वन विभागाने पिंजरे लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वन विभाग जीवितहानी होण्याची वाट पाहत तर नाही ना, असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT