Latest

Pune : पानसरेवाडी व अहिनवेवाडी हद्दीत बिबट्यांचे हल्ले

अमृता चौगुले

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  ओतूर परिसर बिबटप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून दररोज कुठेना कुठे मानवी हल्ला अथवा पशुधनावर बिबट्याचे हल्लासत्र सुरूच आहे. मागील २४ तासात बिबट्याने दोघांवर केलेल्या हल्ल्यात ते दोघे जखमी झालेत, तर एका ठिकाणी बिबट्याने रेडकूचा फडशा पाडला.

सोमवारी (दि. ८) रात्री ७ वाजेच्या सुमारास एक शेतकरी ओतुरहून गोंदेवाडी येथील आपल्या घराकडे परतत असताना ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या दुचाकीस्वार शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक झेप घेऊन त्यास जखमी केले आहे. बबन काशिनाथ जाधव असे किरकोळ जखमी शेतकऱ्याचे नाव असून बालंबाल बचावलेल्या जाधव हे प्रथोमोपचार करून घरी विश्रांती घेत आहे. अशीच एक घटना ओतूर हद्दीतील पानसरेवाडीत घडली. ओतूर ग्रामपंचायतीचे वाहन चालक गणेश बाबाजी पानसरे हे सोमवारीच सकाळी ७ वाजेच्या सुमारास कामावर रुजू होण्यासाठी दुचाकीवरून ओतूर येथे येत असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर अचानक मागून हल्ला चढविल्याने ते दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाले आहेत.

बिबट्याने दुचाकीच्या मागील सीटवर मोठ्या प्रमाणात ओरखडे ओढले असून मागून दुसरे एक वाहन येत असल्याचे पाहून बिबट्याने धूम ठोकली. परिणामी पानसरे बचावले. पानसरे यांना गाडीवरून पडल्याने त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली असून ते देखील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आणखी एका घटनेत खामुंडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी दादाभाऊ नथू डुंबरे यांचे म्हशीचे गोठ्यात घुसून मंगळवारी (दि. ९) पहाटे ५ वाजेच्या सुमारास बिबट्याने एका रेडक्यावर हल्ला करून त्यास ठार केले आहे. शेतकऱ्याचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून या सर्व घटना २४ तासांचे आत घडल्याने या परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात खुलेआम वावर असल्याचे निदर्शनास येते.

ज्या ठिकाणी हल्ले होत आहेत तेथे ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे हे तात्काळ हजर होऊन परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत. सोबत वनरक्षक विश्वनाथ बेले, फुलचंद खंडागळे, साहेबराव पारधी हे सर्वोतोपरी मदत करीत आहेत. एकूणच बिबट्यांनी नागरिकांसह वन कर्मचाऱ्यांची देखील झोप उडविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

बिबट सफारी विषय पुन्हा रेंगाळला

आंबेगव्हान येथील प्रस्तावित बिबट सफारी केंद्राचे काम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. केवळ बिबट्याच्या हल्ल्याच्या बातम्या कानावर आदळत असून प्रत्यक्ष बिबट सफारी कामाला कधी सुरुवात होणार याची संपूर्ण तालुक्यात चर्चा जोर धरू लागली आहे. सफारी कामाला प्राधान्य दिल्यास मानवी जीवितास असलेला धोका निश्चितच संपुष्टात येऊ शकतो मग नेमके हेच काम मागे का राखून ठेवण्यात येत आहे, असा सवाल नागरिक करीत आहेत.

SCROLL FOR NEXT