Latest

विधान परिषद निवडणूक : भाजपकडून ५ उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंना वगळले

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील विधान परिषदेसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ५ उमेदवारांची यादी आज (दि.८) जाहीर केली आहे. या यादीत भाजपच्या घटक पक्षांतील नेत्यांना डावलण्यात आले आहे. तर पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना वगळून उमा खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात विधान परिषदेसाठी २० जूनरोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. कोणाला उमेदवारी द्यावी, याची निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. आम्ही फक्त कोरी पाकीट आहोत, पक्ष जो निर्णय घेतो, तो आम्हाला मान्य असतो. अशीही प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

पंकजा मुंडे यांचा २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यापासून पंकजा यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांतून होऊ लागली आहे. त्यांना राज्यसभेसाठीही डावलण्यात आले. दरम्यान, त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सचिव पद देण्यात आले. पंकजा मुंडे आता राष्ट्रीय राजकारणात रमल्या असताना राज्यातील राजकारणापासून त्याकाही दूर आहेत. मुंबईतील ओबीसी आरक्षण मोर्चा, औरंगाबाद येथे पाण्यासाठी भाजपने काढलेला जलआक्रोश मोर्चा यापासून त्यांनी दूर राहणे पसंत केले. यावरून त्यांची काहीशी नाराजी दिसून आली. त्या पक्षाच्या कार्यक्रमापासूनही अंतर ठेवून आहेत. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन राज्याच्या राजकारणात सक्रीय करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीही खूप प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. आता पंकजा कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT