Latest

कोल्हापूर : अज्ञातांनी खोडसाळपणाने फ्लँज काढल्याने थेट पाईपलाईनला गळती

Arun Patil

कोल्हापूर/देवाळे, पुढारी वृत्तसेवा : थेट पाईपलाईन योजना पूर्ण होऊन काळम्मावाडी धरणातील पाणी शुक्रवारी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात आले. आता योजनेवरून श्रेयवाद रंगला आहे. त्यातच शनिवारी सकाळी अज्ञातांनी खोडसाळपणा करून चार ठिकाणच्या एअरव्हॉल्व्हला लावलेल्या फ्लँजचे नटबोल्ट काढून नेले. त्यामुळे हळदी-कुर्डूदरम्यान गळती निर्माण होऊन पाईपलाईनमधून पाण्याचे फवारे सुमारे 50 ते 60 फूट उंच कारंजासारखे उडत होते. दरम्यान, महापालिकेने युद्धपातळीवर फ्लँजला नटबोल्ट बसविण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते.

अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची सूचना ठेकेदाराला दिली असल्याचे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून पाणी पुरविण्यासाठी पुईखडीपर्यंत 53 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. 1,800 मि.मी. व्यासाची पाईपलाईन आहे. लांबी जास्त आणि पाईपलाईनचा व्यास जास्त असल्याने पाण्याची लेव्हल पाहण्यासाठी ठिकठिकाणी एअरव्हॉल्व्हच्या ठिकाणी फ्लँज बसविण्यात आले आहेत. सकाळी साडेसहाच्या सुमारास हळदी-कुर्डूदरम्यानच्या पाईपलाईनच्या फ्लँजचे नटबोल्ट अज्ञाताने काढून नेले. योजनेंतर्गत पाईपलाईनमधून पाणी सोडल्यानंतर त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात हवेत पाण्याचे फवारे उडू लागले. लाखो लिटर पाणी गेल्याने बाजीराव चौगले व अन्य शेतकर्‍यांच्या शेतीचे नुकसान झाले.

काही शेतकर्‍यांच्या निदर्शनास ही घटना आली. एवढे मोठे पाण्याचे फवारे असल्याने काही ग्रामस्थांनी व्हिडीओ केले. काही वेळातच व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून थेट पाईपलाईनला गळती लागल्याची माहिती जिल्ह्यात पसरली. त्यामुळे महापालिका प्रशासनही हादरले. जलअभियंता सरनोबत यांच्यासह ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. एअरव्हॉल्व्ह बंद करून गळती शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही गळती सुरू राहून पाण्याचे फवारे उडत होते. दिवसभर गळती सापडली नाही. अखेर सायंकाळी फ्लँजची तपासणी करताना नटबोल्ट काढून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुन्हा तपासणी केली असता हळदी गावात दोन आणि कांडगावमध्ये एक अशा ठिकाणी फ्लँजचे नटबोल्ट नसल्याचे आढळून आले. रात्री 10 वाजेपर्यंत हळदी व कुर्डू येथील काम पूर्ण झाले. त्यानंतर कांडगावमधील फ्लँजला नटबोल्ट बसवण्याचे काम सुरू करण्यात आले, अशी माहिती जलअभियंता सरनोबत यांनी दिली.

SCROLL FOR NEXT