Latest

Latur News : हतबल शेतकऱ्याने सोयाबीन रस्त्यावर उधळले, आरटीओने दंड केल्याने व्यथित

स्वालिया न. शिकलगार

लातूर : पुढारी वृतसेवा – सोयाबीन विक्रीला नेत असताना आरटीओने गाडी अडवून दंड आकारल्याने व्यथित झालेल्या शेतकऱ्याने चक्क सोयाबीन रस्त्यावर उधळले. (Latur News ) शेतकऱ्यांची हतबलता आणि व्यवस्थेच्या जाचाचा त्यांनी पाढाच वाचला. बुधवारी (दि.३) सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली. शेतकऱ्यांचा हा आक्रोश पाहून अनेकांना यावेळी गलबलून आले. (Latur News )

संबंधित बातम्या –

सध्या सोयाबीनचे भाव पडले असून नाईलाजाने अशा कवडीमोल भावात शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. विशेष म्हणजे वाहतूक करताना काही दंड लागला तर तो शेतकऱ्यांनी दिला पाहीजे या अटीवर त्याच्या शेतमालाची वाहतूक केली जाते, अशी चर्चा आहे. दरम्यान बुधवारी सकाळी रेणापूर तालुक्यातील एक शेतकरी त्याचे सोयाबीन लातूरच्या आडत बाजारात एका टॅम्पोतून नेत असताना आरटीओच्या पथकाने टॅम्पो अडवून १२ हजार ५०० रुपये दंड केला. शिवाय बारा वाजेपर्यंत त्याची गाडी थांबवून ठेवली.

लातुरच्या आडत बाजारात सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास सौदा निघतो त्या वेळेत शेतकर्याचा माल तिथे पोहोचणे गरजेचे असते.

तथापी, टॅम्पो १२ वाजेपर्यंत सोडला नसल्याने माल आडत बाजारात जावू शकला नाही. या साऱ्याने व्यथित झालेल्या त्या शेतकऱ्याने गाडीतील सोयाबीनचे एक पोते येथील छत्रपती शिवाज महाराज चौकातील रस्त्यावर ठेवले. त्यातील सोयाबीन रस्त्यावर उधळले. त्याने आपले दु:ख, हतबलता अन् व्यवस्थेचा जाच जाहीर केला. 'सोयाबीन घ्या फुकट' असे म्हणत आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांना या शेतकऱ्याने सोयाबीन कुठे विकायचे? असा सवाल करीत आरटीओचा धिक्कार केला.

याबाबत आरटीओ कार्यालयाशी संपर्क केला असता गाडीचे फिटनेस नसल्याने दंड आकारला. ओव्हरलोडचा दंड लावला नाही, असे आरटीओच्या सूत्रांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT