बेळगाव : पुढारी वृत्तसेवा गानसम्राज्ञी लता मंगेशकर (लतादीदी) या कोल्हापुरात आल्या की विमानप्रवासासाठी बेळगावात येत असत. लतादीदींना बेळगावविषयी नेहमीच आकर्षण होते. त्या अवघ्या अकरा वर्षांच्या असताना बेळगावात वडिलांसोबत आल्या होत्या. यावेळी त्यांना प्रसंगावधान राखून गायन करण्याच वेळ आली होती. अचानक गायनाची आलेली जबाबदारी फक्त त्यांनी पेलली नाही, तर बालस्वरांनी ती मैफल गाजवली होती. अद्वितीय गळा, अस्स्खलित वाणी, तल्लख बुध्दी हे उपजत गुण लता मंगेशकर यांच्याजवळ होते. याची प्रचिती 80 वर्षापूर्वी बेळगावकरांनी घेतली होती. लतादीदींना पहिले संगीताचे धडे हे वडिलांकडूनच मिळाले होते. वयाच्या पाचव्या वर्षापासून लतादीदींचे संगीताशी नाते जुळले होते.
तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बालकलाकार म्हणून कामाची सुरूवात केली होती. युनियन जिमखाना येथे 1940 मध्ये 'जलसा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या 'जलसा' कार्यक्रमात वाद्यसंगीत, नाट्यप्रवेश, विनोदी सादरीकरण असायचे. या कार्यक्रमासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर आपली ज्येष्ठ कन्या लताला घेऊन बेळगावात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळ असला तरी संगीतरसिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाआधी एक तास अचानक दीनानाथ मंगेशकर यांची तब्येत बिघडल्याने संयोजकांची तारांबळ उडाली. यावेळी दीनानाथ यांनी कार्यक्रमात लता काही गाणी सादर करतील, असे सांगितले. लता या पाच वर्षांच्या असतानापासून गायन करत होत्या. बेळगावात प्रथमच आलेल्या लता यावेळी अकरा वर्षाच्या होत्या. संयोजकांकडून कार्यक्रमात लता मंगेशकर नाट्यगीत सादर करतील, असे जाहीर करण्यात आले. परगावाहून आलेली लहानगी पोरगी काय गायन करणार, अशी रसिकवर्गात चर्चा होत होती. मात्र काही वेळातच वेगळीच अनुभूती आली.
कार्यक्रम प्रत्यक्ष सुरू झाला आणि प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान ऐकताना रसिक तल्लीन झाले. गोड गळा आणि गायनातील आत्मविश्वास पाहून उपस्थित अचंबित झाले. लताचे गाणे सुरू असताना टाळ्यांचा गजर घुमत होता. बेळगावचे पं. रामभाऊ विजापुरे यांनी त्यांना वाद्यसाथ केली होती. चिमुकल्या मुलीने रसिकांची मने जिंकल्याने या मुलीचे नाव त्यावेळेपासून बेळगाव परिसरात परिचयाचे झाले. पुढे दोन वर्षानी मास्टर दीनानाथ यांचे निधन झाल्यानंतर लतादीदीने घरची जबाबदारी पेलत संगीत क्षेत्रात कशी वाटचाल केली, हे सर्वज्ञात आहे.
लतादीदी बेळगावात खासगी कार्यक्रमानिमित्त येत असत. हे प्रमाण मात्र अत्यल्प होते. बेळगावातील शहापुरी साड्यांचेही त्यांना विशेष आकर्षण होते. कोल्हापुरला जाण्यासाठी त्या बेळगावला उतरून पुढे प्रवास करत. 1970 च्या आधी त्या कोवाड (ता. चंदगड) येथील 'स्वामी'कार रणजीत देसाई यांच्या निवासस्थानी येत असत. बेळगाव आणि चंदगड भागातील निसर्ग, एकांतवास त्यांना आवडत असे. त्यांनी या भागाचे कसे कौतुक केले, हे 'स्वामी'कार रणजीत देसाई यांनी लेखात शब्दबध्दही केले आहे. दैनंदिन धावपळीतून वेळ काढत त्या मन प्रसन्न करण्यासाठी सीमाभागात येत असत. बेळगाव परिसरातील धामिर्ंक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या होत्या.
हेही वाचलतं का?