Latest

संस्‍कृती : जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर

Arun Patil

अमेरिकेत न्यू जर्सीतील रॉबिनविल्स भागात जगातील सर्वात मोठे अक्षरधाम हिंदू मंदिर आता खुले झाले असून देशोदेशीचे भाविक पर्यटक इथे मोठ्या संख्येने येत आहेत. तब्बल नऊ कोटी 60 लाख डॉलर्स खर्चून 183 एकर क्षेत्रात उभी राहिलेली ही भव्य सुंदर वास्तू हिंदू संस्कृतीची मूल्ये अधोरेखित करते.

अमेरिकेत हिंदू मंदिरांची संख्या सुमारे 450 हून अधिक असली तरी अलीकडे सेंट्रल न्यू जर्सी भागात रॉबिनविल्स इथे उभारलेल्या भव्य, रेखीव अशा अक्षरधाम मंदिराने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ अमेरिकेतच नव्हे तर पश्चिम गोलार्धातील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून ते ओळखले जाते. जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून यापूर्वी ज्ञात असलेले अँगकोर व्हॉट हे कंबोडियातील मंदिर आता बुद्धिस्ट टेम्पल झाल्याने या न्यू जर्सी मधील स्वामी नारायण मंदिराचे महत्त्व आणखी वाढले आहे. यापूर्वी नवी दिल्ली आणि आणि गुजरात इथे अक्षरधाम मंदिरे उभी करण्यात आली. आता हे तिसरे मोठे मंदिर (भारताबाहेर) हिंदू संस्कृतीच्या अभिमानाचे सुंदर प्रतीक म्हणून अनेकांचे आकर्षण ठरत आहे. गुजरातमध्ये मुख्यालय असलेली बोचसंवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था म्हणजेच बी ए पी एस या प्रकल्पाची निर्माती. हिंदू धर्माच्या शिकवणीला पाठबळ देणार्‍या या आध्यामिक संस्थेची अमेरिका, कॅनडा. इंग्लंड, ऑस्ट्रोलिया, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि इतर देशात 1400 हून अधिक मंदिरे असून त्यांच्या अमेरिकेतील आगमनाला पुढील वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

तब्बल 9 कोटी 60 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 787 कोटी रुपये खर्चून 183 एकर क्षेत्रात उभे केलेले हे मंदिर आणि त्याचा परिसर भारतीय आणि हिंदू संस्कृती यांची ओळख करून देणारे एक पवित्र आणि मंगलमयी तीर्थक्षेत्र होऊ पाहात आहे. सुमारे 12 वर्षे अखंड बांधकाम चाललेले हे मंदिर अलीकडेच 18 ऑक्टोबरपासून सर्वधर्मीयांसाठी खुले झाले. तिथे केवळ भारतातील नव्हे; तर जगातील अनेकजण हा आध्यत्मिक, कलात्मक, सांस्कृतिक आविष्काराचा अनुभव घेण्यासाठी येत असल्याचे सुखद द़ृश्य यावेळी पाहता आले. माझ्या न्यू जर्सीच्या सहलीत या वास्तूला भेट देण्याची उत्सुकता साहजिकच अधिक होती. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरपासून दक्षिणेला 90 किलोमीटरवर तर वॉशिंग्टन डीसीपासून उत्तरेला 289 किलोमीटर अंतरावर हे स्थान असल्याने अनेक पर्यटकांना आणि भाविकांना ते सोयीचे आहे. अमेरिकेत हिंदूंची संख्या 25 लाखांच्या घरात असून प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसर न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क या दोन्ही भागात ती तुलनेने अधिक म्हणजे प्रत्येकी सुमारे चार लाख इतकी आहे. त्यामुळे न्यू जर्सीतील भारतीय अमेरिकन रहिवाशांच्या द़ृष्टीने हा एक अभिमानाचा विषय झाला आहे.

या मंदिर उभारणीत केवळ न्यू जर्सीतील नव्हे तर अमेरिकेच्या इतर भागातील तसेच जगातील अनेक देशातील असंख्य भाविकांचा सहभाग आहे. विभिन्न पार्श्वभूमी असलेल्या सुमारे साडेबारा हजारांवर स्वयंसेवकांनी आणि कारागिरांनी 47 लाख तास या सेवेसाठी आनंदाने दिले. सुमारे 20 लक्ष क्युबिक फूट इतके मौल्यवान दगड वापरताना त्यातही सर्वोत्कृष्ट निवड हा महत्त्वाचा निकष होता. इटलीतून 4 प्रकारचे संगमरवरी दगड आणि बल्गेरियातून विशिष्ट प्रकारचे लाईमस्टोन यासाठी आयात केले गेले. चीन, ग्रीस आणि भारतातूनही काही ग्रॅनाइटस् आणि मार्बल आणले गेले. त्यानंतर भारतात कुशल कारागिरांनी सूचनेनुसार या संगमरवरी दगडातून विविध शिल्पकृती साकारल्या. मंदिरांच्या बांधकामासाठी लागणारी विविध डिझाईन्स तयार करून त्या अमेरिकेला त्या त्या नंबरनुसार पाठविल्या. हे नंबर लक्षात घेऊन हे महामंदिर जिग सॉ पद्धतीने आकाराला आले.

मंदिराच्या भव्य शिखरामागे संध्याकाळचा सूर्य मावळत असताना इथे भेट देणे हा आनंददायी अनुभव म्हणायला हवा. रात्रीही हा परिसर आल्हाददायी दिव्यांच्या रंगीबेरंगी प्रकाशात अधिकच खुलून दिसतो. निसर्गाच्या परिसरात इथे लक्ष वेधून घेतो तो म्हणजे नीलकंठ वारणी यांचा सोनेरी रंगातील 49 फूट उंचीचा एका पायावर उभा असलेला एका यौगिक अवस्थेतील पुतळा. या पंथाचे प्रमुख भगवान स्वामीनारायण यांच्या तरुणपणीची ही प्रतिमा. त्यांनी हिंदू धर्माच्या उदात्त मूल्यांचा प्रसार करण्यासाठी 7 वर्षे 8 हजार मैल भारत भ्रमण केले. त्यांच्या नंतर लक्ष वेधून घेतो ब्रह्मकुंडाच्या जलाशयाचा परिसर. इथे जगातील 300 नद्यांचे पाणी एकत्र आणले गेले. त्यात भारतातील 108 नद्या आणि अमेरिकेच्या 50 राज्यातील नद्यांचे पाणी आणण्याची कल्पना वैश्विक एकात्मता साधणारी म्हणायला हवी. या परिसरात संध्याकाळी संस्कृत मंत्रपठण आणि धूप, उदबत्त्यांचा दरवळ याचा अनुभव मंगलमय चित्त शुद्धी करणारा ठरल्यावाचून राहात नाही. इथे स्वागत दालनही दिवाळीसारख्या पणत्यांच्या दिव्यांनी उजळून निघालेले दिसेल.

प्राचीन हवेली आर्किटेक्चरल शैलीतील वास्तूरचना असलेले हे दालन आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करते. तेथून बाहेर पडल्यावर प्रशस्त परिसरात छोट्या मंदिरांच्या सान्निध्यात महामंदिर आपल्यापुढे येते. वास्तुरचना शास्त्रातील आश्चर्यकारी अद्भुत आविष्कार असे त्याचे वर्णन करावे लागेल. प्राचीन भारतीय शिल्प आणि स्थापत्य शास्त्राचा वापर स्ट्रक्चरल मेजरमेंटस्, ले आऊट, डिझाईन्ससाठी इथे करण्यात आला, हे विशेष. प्राचीन आणि आधुनिक शैलीचा मिलाफ इथे पावलोपावली जाणवतो. महामंदिराचे प्रमुख शिखर सुमारे 200 फूट उंच असून अवतीभवती 12 छोटी छोटी मंदिरे आहेत. एकूण 9 शिखरे आणि 4 डोम्स इथे पाहता येतात. मध्यवर्ती भागात पंथाचे प्रमुख नारायण स्वामी यांची मूर्ती असून अवतीभवती राम-सीता, राधा-कृष्ण, शंकर-पार्वती, तिरुपती बालाजी आणि पद्मावती यांच्या सुबक रंगीत मूर्तीही पाहता येतात. तीर्थ, परब्रह्म, अक्षरब्रह्म, मुक्त, ऐश्वर्य, परमहंस आदी मंडपम भारतीय शिल्पकृतींच्या सौंदर्याने नटलेले आहेत.

महाभारत, रामायण यांच्यासंबंधीची म्युरल्स, हिंदू अ‍ॅस्ट्रोलॉजी आणि अ‍ॅस्ट्रॉनॉमीची दखल घेणारी राशी आणि नक्षत्र प्रतीके, भरतनाट्यमच्या 108 पोझेस, 4 वेदांचे स्तंभ, बद्रीनाथ, केदारनाथ सारख्या तीर्थस्थळांची ओळख करून देणारी शिल्पे, गंगा, शरयू, यमुना, सरस्वती या नद्यांच्या देवता, भारतीय संगीत, नृत्य कला किती समृद्ध आहे ही दर्शविणारी शिल्पे, विविध वाद्ये, संत तुकाराम, रोहिदास यांच्या मूर्ती, श्री गणेशाचे शिल्प, आर्यभट्ट, भास्कराचार्य आदी भारतीय शास्त्रज्ञांचे स्मरण करून देणारे त्यांचे पुतळे असा थक्क करून सोडणारा हा प्रवास हिंदू आणि भारतीय संस्कृतीची महानता अधोरेखित करणारा आहे. एकूण शिल्पकृतींची संख्या 10 हजारांवर आहे. मुख्य घुमट सुंदर कलाकृतीचा अनोखा नमुना ठरेल. मार्टिन ल्युथर किंग, सॉक्रेटिस, अल्बर्ट आइन्स्टाईन आदी विचारवंतांच्या सुविचारांनी बाहेरच्या भिंती सजलेल्या आहेत. याखेरीज म्युझियमदेखील पाहण्यासारखे वाटेल. गिफ्ट शॉपमध्येही हिंदू संकृतीची अनेक प्रतीके भेट देण्याजोगी वाटतील. चविष्ट भारतीय खाद्य पदार्थांची रेलचेल असणारे प्रशस्त जागेतील सुंदर कॅफे हेही इथे आलेल्यांचा आनंद वाढवणारे ठरेल.

येथील कोलंबिया विद्यापीठात धर्म या विभागाचे प्राध्यापक योगी त्रिवेदी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले, "हिंदू संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना आम्ही 8 हजार मैलांचा हवाई प्रवास करून भारतात नेत असू. पण या मंदिराने आमचे काम सोपे केले आहे. या संस्कृतीची ओळख या मंदिरामुळे इथेच अधिक चांगल्या पद्धतीने करून देता येईल." मंदिरात देवाचा निवास आहे, अशी हिंदूधर्मीयांची धारणा असते. भारतात टेम्पल इज द हार्ट ऑफ रिलीजस लाईफ, असे म्हटले जाते. येथील हिंदूंनाही त्याचे अप्रूप असणे स्वाभाविक आह. न्यू जर्सीमध्ये गेली 30 वर्षे वास्तव्य करणारे प्रशांत आणि वैशाली निरंतर या मंदिरात आले होते. त्यांचीही अशीच भावना होती. भारतीय अमेरिकन रहिवाशांना आपल्या संस्कृतीचा सदैव अभिमान असतो. त्याची जपणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच आम्ही गणपती, नवरात्र, दिवाळी उत्साहाने साजरी करतो. आपल्या रूटकडे (मुळाकडे) जाण्याचे कनेक्शन म्हणजे आम्ही या मंदिराकडे अभिमानाने पाहतो, असे ते म्हणाले.

हे मंदिर सर्वधर्मीयांसाठी खुले ठेवण्याच्या निर्णयाचे अर्थातच स्वागत करायला हवे. कारण हिंदू धर्मात आपण 'वसुधैव कुटुम्बकम'च्या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. हे केवळ हिंदूंचे पूजास्थान नाही. भारतीय किंवा भारतीय अमेरिकन यांच्यापुरतेही हे सीमित नाही. जगात मानवतेसाठी, परस्पर स्नेहभाव वाढावा यासाठी, सर्वांच्या सुखासाठी ज्या शाश्वत वैश्विक मूल्यांचा पुरस्कार आपल्या संस्कृतीत करण्यात आला आहे, याचे प्रतीक म्हणून या मंदिराकडे पाहायला हवे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT