Latest

राहुल गांधींची झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी, नाशिकमध्ये ‘भारत जोडो न्याय’ यात्रेला उत्फुर्त प्रतिसाद,

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-'त्यांच्या' फक्त एका झलकसाठी शहरातील आबालवृद्ध द्वारका ते सीबीएस परिसरात ठिकठिकाणी उभे होते. 'राहुल जी, राहुल जी' असा आवाज देत नागरिकांनी काँग्रेस नेते व खा. राहुल गांधी यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. त्यास खा. गांधी यांनीही हात उंचावून प्रतिसाद दिला. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालेल्यांच्या उत्साहास पारावार उरला नाही. यात्रेतील गर्दीत मिळेल तेथून वाट काढत नागरिकांनी राहुल गांधी यांची एक छबी टिपण्यासाठी व हस्तांदोलनासाठी प्रयत्न केले.

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते व खा. राहुल गांधी गुरुवारी (दि.१४) दुपारी सव्वातीनच्या सुमारास द्वारका सर्कल येथे आले. तेथून त्यांनी राेड शो ला सुरुवात केली. द्वारका सर्कल येथे ढोल पथकाच्या वादनाने खा. गांधी यांचे स्वागत झाले. यावेळी खा. गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले व स्थानिक पदाधिकारी होते. रोड शो दरम्यान अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू, निवेदन दिले. यात्रामार्गात उभारलेल्या स्वागत कक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही गांधी यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. यावेळी यात्रामार्गात असलेल्या निवासी नागरिकांनीही गांधी यांच्यासोबत हस्तांदोलन केले. यावेळी 'राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो' अशा घाेषणा देण्यात आल्या. शालिमार येथे चौक सभेतही राहुल गांधी यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधत त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते सीबीएस, त्र्यंबकरोड मार्गे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाले. दुपारी सव्वातीन ते सायंकाळी साडेचारपर्यंत राहुल गांधी यांनी शहरात रोड शो व चौक सभा घेतली.

क्षणचित्रे :

-उड्डाणपुलावर वाहने थांबवून नागरिकांची राहुल गांधी यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.

– राहुल गांधी यांना पुष्पगुच्छ, निवेदन, भेटवस्तू देण्यासाठी नागरिकांची लगबग

– द्वारका सर्कल येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

– आबालवृद्धांचा उत्साह, महिलांची संख्या लक्षणीय

सहकुटुंब हजेरी

अनेक जण लहानांपासून वृद्धांपर्यंत सहकुटुंब राहुल गांधी यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून राहुल यांची छबी टिपली. तर अनेकांनी राहुल गांधी यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना यश आलेही. गर्दीत अनेक वृद्ध व्यक्ती चालताना दिसून आले. त्यामुळे गांधी कुटुंबातील व्यक्तीस जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाल्याने त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

पदाधिकारी – पोलिसांत वाद

दुपारी दीडच्या सुमारास द्वारका परिसरात काँग्रेस पदाधिकारी गोळा होत होते. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी खा. राहुल गांधी यांची यात्रा द्वारकाऐवजी सारडा सर्कल येथून सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बहुतांश कार्यकर्ते सारडा सर्कलच्या दिशेने गेले. ही बाब पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याचा जाब विचारला. मार्ग बदलाचे आदेश दाखवण्याची मागणी केली. त्यानंतर द्वारका सर्कलवरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खा. गांधी यांचे स्वागत केले.

गर्दीत रेटारेटी

यात्रा सुरू झाल्यानंतर यात्रेत युवावर्ग मोठ्या प्रमाणात दिसला. मात्र, त्यांच्या जोडीला महिला व वृद्धांचीही गर्दी पाहावयास मिळाली. त्यामुळे द्वारका सर्कल ते सीबीएसपर्यंत दुतर्फा नागरिकांची गर्दी होती. खबरदारी म्हणून पोलिसांनी दाेरखंडाने राहुल गांधी यांचा ताफा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी खा. गांधी यांच्या वाहनापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न केल्याने गर्दीत रेटारेटी झाली. त्यावरून काहींमध्ये वादविवादाचे प्रसंगही पाहावयास मिळाले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

यात्रामार्गात व यात्रेदरम्यान पोलिसांनी बंदोबस्ताचे कडेकोट नियोजन केले होते. यात्रामार्गात दुतर्फा पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. साध्या वेशातील पोलिसही यात्रेत सहभागी होते. यात्रेत हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी समज दिली. उंच इमारतींवरूनही पोलिसांनी यात्रामार्गात नजर ठेवली होती.

खा. राहुल गांधी यांच्या ताफ्यात छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान राज्यांमधील पदाधिकाऱ्यांची वाहने होती. त्याचप्रमाणे यात्रेच्या नियोजनात यात्रेची क्षणचित्रे सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी परराज्यातील काही युवकही सहभागी झाली होती. या युवकांनी नाशिककरांच्या मनातील काँग्रेसबद्दलची मते तसेच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT