Latest

शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गावर कोसळली दरड; काही काळ वाहतूक ठप्प

अमृता चौगुले

वाडा, पुढारी वृत्तसेवा: शिरगाव (ता. खेड) येथील नेकलेस धबधब्याजवळ शिरूर-भीमाशंकर राज्य मार्ग क्र. १०३ वर डोंगराचा काही भाग कोसळल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

अनेक पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि भाविक भीमाशंकरला जाण्यासाठी आले होते. सोमवारी सायंकाळी शिरगाव गावाच्या हद्दीत शिरूर-भीमाशंकर या मार्गावर दरड कोसळल्यामुळे हा मार्ग ठप्प झाला. घराकडे परतणाऱ्या वाहणांची संख्या मोठी असल्याने एका बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. भीमाशंकर येथील बंदोबस्त करून परतत असताना खेडचे पोलिस निरिक्षक सतीष गुरव यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी तातडीने जेसीबी मशीन बोलावून रस्ता खुला करण्यास सुरूवात केली. सुमारे दोन तासानंतर पुन्हा वाहतुक सुरळीतपणे सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. प्रशासनाकडून पर्यटकांना आणि वाहनचालकांना सावधानतेची सूचना दिली गेली आहे. धोकादायक ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT