Latest

Lal Bahadur Shastri : मी तर या देशाचा एक सामान्‍य नागरिक; माझ्‍यासाठी कोणतीही विशेष व्‍यवस्‍था करु नका – लाल बहादूर शास्त्री

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही नेते आपले व्‍यक्‍तिमत्‍व, दूरगामी निर्णय आणि चारित्र्यामुळे समाजावर अशी अमीट छाप सोडतात की, अनेक पिढ्या त्‍यांचे स्‍मरण करते. त्‍यांनी दिलेल्‍या आदर्शवत पायवाटेवर चालण्‍याचा प्रयत्‍नही करते. असेच एक नेते म्‍हणून आपण देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्‍त्री (Lal Bahadur Shastri) यांना ओळखतो. बोले तैसा चाले । त्‍याची वंदीन पाउले… हा तुकोबाचा अंभग खर्‍या अर्थाने जगणारे ते नेते होते. आज २ ऑक्टोबर. लालबहादूर शास्‍त्री यांची जयंती. 

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्‍या निधनानंतर सर्वांच्‍या मनात एकच प्रश्‍न होता 'देशाचे पुढील पंतप्रधान कोण होणार?'. नेहरु यांच्‍या निधनानंतर दोन आठवड्यांनी लालबहादूर शास्‍त्री (Lal Bahadur Shastri) यांनी पंतप्रधानपदी शपथ घेतली. साधी राहणी आणि उच्‍च विचारसरणी हे तत्‍व खर्‍या अर्थाने जगलेले नेते लालबहादूर शास्‍त्री यांच्‍या जंयतीनिमित्त जाणून घेऊया त्‍यांच्‍या आदर्श जीवनशैलीतील काही प्रसंग…

 माझ्‍यासाठी कोणतीही विशेष व्‍यवस्‍था करु नका

लालबहादूर शास्‍त्री हे देशाचे गृहमंत्री असताना कोलकाता दौर्‍यावर होते. ते विमानाने दिल्‍लीला जाणार होते. त्‍यावेळी रस्‍त्‍यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्‍यामुळे विमानतळावर वेळेत पोहचणे जवळपास अशक्‍य होते. त्‍यामुळे कोलकाताचे तत्‍कालिन पोलिस आयुक्‍तांनी लालबहादूर शास्‍त्री यांच्‍या वाहनासाठी विशेष व्‍यवस्‍था करण्‍याची तयारी केली. मात्र लालबहादूर शास्‍त्री यांनी अशी कोणतीही व्‍यवस्‍था करु नका, असे सांगितले. कोलकातामधील लोकांना वाटेल की रस्‍त्‍यावरुन कोणतीही महनीय व्‍यक्‍ती निघाला आहे; पण मी तर या देशाचा एक सामान्‍य नागरिक आहे. त्‍यामुळे विलंब झाला तरी चालेल;पण माझ्‍यासाठी कोणतीही विशेष व्‍यवस्‍था करु नका, असे विनम्र सूचना त्‍यांनी कोलकाता पोलिस आयुक्‍तांना केली होती.

सामान्‍य व्‍यक्‍तीसाठी फर्स्ट क्‍लास व्‍यवस्‍था कशासाठी?

लालबहादूर शास्‍त्री देशाचे पंतप्रधान झाले. एकदा एका राज्‍याच्‍या दौर्‍याचे नियोजन होते. मात्र त्‍याचवेळी महत्‍वाचे काम निघाले. हा दौरा रद्‍द झाला. संबंधित राज्‍याच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी दौरा रद्‍द करु नका. आम्‍ही तुमच्‍यासाठी फर्स्ट क्‍लास व्‍यवस्‍था केली आहे, असे त्‍यांना सांगितले. त्‍यावर लालबहादूर शास्‍त्री यांनी प्रश्‍न केला की, 'तुम्‍ही एका सामान्‍य व्‍यक्‍तीसाठी फर्स्ट क्‍लास व्‍यवस्‍था कशासाठी केली?' या प्रश्‍नाचे उत्तर देण्‍यास संबंधित मुख्‍यमंत्री असमर्थ ठरले हाेते.

Lal Bahadur Shastri : आठवड्यातून एकदा किमान एक दिवस उपवास करा 

१९६५ मध्‍ये भारत-पाकिस्‍तान युद्ध सुरु होते. यावेळी देशातील अन्‍नधान्‍य संकट मोठे होते. यावेळी अमेरिकेने भारताला करण्‍यात येणारी अन्‍नधान्‍य निर्यात बंद करण्‍याची धमकी दिली होती. यावेळी पंतप्रधानपदी असणार्‍या शास्‍त्री यांनी आपल्‍या कुटुंबात दिवसभरात एकावेळीच चूल पेटेल, असा निर्णय घेतला. मुलांना दूध आणि फळे दिली जातील. तर कुटुंबातील सर्व प्रौढ व्‍यक्‍ती दिवसातून एकदाच जेवण घेतील, असे त्‍यांनी ठरवलं. त्‍यांनी स्‍वत:सह कुटुंबाला एक आठवडा या नियमाचे पालन करायला सांगितले. त्‍यांनी स्‍वत: कृती केली. यानंतर अन्‍नधान्‍य संकट मात करण्‍यासाठी देशवासियांनी आठवड्यातून एकदा किमान एक दिवस उपवास करावा, असे आवाहन केले. या विनम्र आवाहनाचा मोठा परिणाम झाला. लालबहादूर शास्‍त्री यांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस उपवास सुरु केला होता.

Lal Bahadur Shastri : पत्‍नीने फॅमिली पेंशनमधून फेडले होते कर्ज

लालबहादूर शास्‍त्री पंतप्रधान होते त्‍यावेळी त्‍याच्‍या मुलाने आपल्‍या व्‍यक्‍तिगत कामासाठी सरकारी कारचा वापर केला. याची माहिती लालबहादूर शास्‍त्री यांना मिळाली. त्‍यांनी तत्‍काळ खासगी कामासाठी झालेला कारचा खर्च सरकारी तिजोरीत जमा केला होता.
११ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्‍त्री यांचा ताश्‍कंदमध्‍ये मृत्‍यू झाला. त्‍याच्‍या आकस्‍मिक मृत्‍यूने संपूर्ण देश हादरला. देशाने एक महान नेता गमावला. लालबहादूर शास्‍त्री यांचे निधन झाले तेव्‍हा त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या नावावर घर नव्‍हते की जमीन. मात्र एक कर्ज होते. पंतप्रधान झाल्‍यानंतर त्‍यांनी फियाट कार घेण्‍यासाठी सरकारकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज त्‍यांच्‍या पत्‍नी ललिता शास्‍त्री यांनी त्‍यांना मिळालेल्‍या फॅमिली पेंशनमधून फेडले होते.

आपले संपूर्ण आयुष्‍य देशसेवेसाठी अर्पण करणारे माजी पंतप्रधान, भारतरत्‍न लालबहादूर शास्‍त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT