Latest

कुरुलकरची होणार व्हॉइस लेअर, सायकॉलॉजिकल टेस्टही !

अमृता चौगुले

दिनेश गुप्ता/महेंद्र कांबळे : 

पुणे : पाकिस्तानशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला पुणे डीआरडीओचा संचालक शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद कुरुलकरचे नवनवे कारनामे उघड होत आहेत. तपास अधिकार्‍यांसमोर तोंड उघडत नसल्याने त्याची व्हॉइस लेअर, सायकॉलॉजिकल एनालिसिस टेस्ट केली जाणार आहे. त्याचबरोबर पॉलिग्राफ चाचणीसाठीही दुसर्‍यांदा एटीएस आग्रही आहे. यासाठी तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात विशेष अर्जही केला आहे.

पुणे शहरात भारतातील लष्करी साहित्य बनवून त्यावर संशोधन करणार्‍या दिघी येथील डीआरडीओत (संरक्षण संशोधन व विकास संस्था) कुरुलकर संचालक म्हणून होता. स्वदेशी बनावटीच्या रॉकेट लाँचरसह 'पिनाका' व 'विभव' या लांब पल्ल्याच्या रॉकेट लाँचरचे संशोधन झाले. असे गोपनीय काम असतानाही कुरुलकरचे संबंध ललनाच्या माध्यमातून पाकिस्तानी इंटेलिजन्सशी जुळले. पाकिस्तानी एजंट असलेल्या झारादास गुप्ताने कुरुलकरला मोहजालात ओढत संरक्षण दलाच्या सुरक्षेत सुरुंग लावला. कुरुलकरच्या हालचालींवर संशय आल्याने त्याचे ई-मेल तपासले असता ते मेल पाकिस्तानी ई-मेलवर आले व गेल्याचे सिद्ध झाल्यानंतर खात्यांतर्गत चौकशी होऊन त्यास 3 मे 2023 रोजी एटीएसने (दहशतवादी विरोधी पथक) गुन्हा दाखल करून अटक केली.

व्हॉइस लेअर, सायकॉलॉजिकल एनालिसिस टेस्टसाठी अर्ज
कुरुलकर यास अटक केल्यानंतर पॉलिग्राफ टेस्ट घेण्यात आली होती. कुख्यात गुन्हेगाराप्रमाणे कुरुलकर तपास यंत्रणेसमोर तोंड उघडत नव्हता. त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या लॅपटॉप व मोबाईलचा पासवर्डही त्याने न दिल्याने तो उघडण्यासाठी गुजरात फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यासाठीही न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. याबरोबरच त्याची व्हॉइस लेअर, सायकॉलॉजिकल एनालिसिस टेस्ट करणे गरजेचे असून, त्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

गुपिते काढणे आवश्यक…
पाकिस्तानी यंत्रणेस कुरुलकरने भारतीय संरक्षण दलाची गोपनीय माहिती पुरविलेली असून, एक महिन्यात त्याने तोंड उघडलेले नाही; म्हणूनच त्याची ही टेस्ट करणे गरजेचे आहे. त्याने ललनेच्या माध्यमातून 'विभव' व 'पिनाका' मिसाइलसह डिटोनेटर्सचे तंत्र दिले असल्याचे दिसते. भारतीय विकसित तंत्र किती पुरविले, याची माहिती गोळा करणे गरजेचे आहे, अशी विनंती एटीएसने केली आहे.

काय असते या चाचणीत..?
या चाचणीत प्रामुख्याने आरोपीच्या आवाजाचा कमी-जास्त स्तर आणि मानसिक स्थिती काय असते? याचा विश्लेषणात्मक अभ्यास करणे म्हणजे व्हॉइस लेअर सायकॉलॉजिकल एनालिसिस टेस्ट होय. पॉलिग्राफ व सायकॉलॉजिकल टेस्टमध्ये कुरुलकरने तोंड उघडले नाही, तर त्याच्या नार्को चाचणीचीही परवानगी मागितली जाऊ शकते. मात्र, या विशेष चाचणीत त्याच्या तोंडून खूप काही माहिती तपास यंत्रणेस मिळू शकते, असे तपास अधिकार्‍यांना वाटते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT