Latest

‘एमएमआरडी’च्या धर्तीवर कोकणसाठी प्राधिकरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

backup backup

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : बाळासाहेबांच्या पाठीशी असणारा कोकणी माणूस आजही त्यांच्या विचारांच्या पाठीशी आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आणि ऐश्वर्य आहे. बाळासाहेब हे तुमचे वडील आहेत; पण आमचे दैवत आहेत. तुम्ही सत्तेसाठी काय काय केले ते सर्वांनाच माहीत आहे; पण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कधीच गद्दारी केलेली नाही. हे सरकार खुद्दारांचे आहे, गद्दारांचे नव्हे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच 'एमएमआरडी'च्या धर्तीवर कोकणसाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

रविवारी सायंकाळी खेड येथील गोळीबार मैदानात झालेल्या या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, कोकणी माणसाने बाळासाहेबांवर त्यांच्या विचारांवर प्रेम केले आहे. त्याचे फलीत आज जमलेल्या गर्दीतून दिसत आहे. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर, आ. भरत गोगावले, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, आ. योगेश कदम, सिद्धेश कदम आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या या सभेत मुंगीला शिरायलाही जागा नाही एवढा जनसागर उपस्थित आहे. कोकण आणि माझे नाते जिव्हाळ्याचे आहे. कोकणातील माणसे प्रेमळ आणि शब्दाला जागणारी आहेत. अशा या चांगल्या लोकांशी आम्ही नव्हे तर तुम्ही गद्दारी केली आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. हिंदुत्वाशी गद्दारी केली. पक्षाला दावणीला बांधले. धनुष्यबाण गहाण ठेवला, तो आम्ही सोडवला. गद्दारी आता नाही तर 2019 ला झाली. बाळासाहेबांचे विचार, भूमिका, हिंदुत्व चुकीचे ठरवत बॉम्बस्फोट

करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेचा डाव आखलात. याकुब मेमनच्या कबरीचे तुम्ही उदात्तीकरण कसे केलात. राहुल गांधी हे स्वातंत्रवीर सावरकरांचा नेहमी अपमान करतात. तो तुम्ही तोंड दाबून सहन कसा करता, असेही ते म्हणाले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे 370 कलम हटवणे आणि राम मंदिर बांधणे हे स्वप्न होते. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. असे बाळासाहेबांचे विचार जपणार्‍या व्यक्तींबरोबर आम्ही 50 जण गेलो तर आमचा निर्णय चुकीचा कसा ठरतो? बाळासाहेब हे तुमचे वडील आहेत. पण आमचे आणि अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. बाळासाहेब माझे वडील असे म्हणत प्रत्येकवेळी सहानुभूती मिळवण्याचा तुमचा प्रयत्न या महाराष्ट्रातील जनतेने ओळखला आहे. तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार म्हणून स्वतःला म्हणवून घेता पण तुम्ही त्यांच्या विचारांचे नाही तर संपत्तीचे वारसदार आहात. बाळासाहेबांचा मुलगा व नातू त्यांच्या नावे मते मागतो, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,असेही ते म्हणाले.

पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी न घेणारे राहूल गांधी देशाची जबाबदारी कशी घेणार? असा टोलाही त्यांनी हाणला. परदेशात देशाची बदनामी करणार्‍या राहुल गांधींना तुम्ही जवळ करता. ज्यांनी सत्तर वर्षे देशाची लूट केली, त्या तुकडे तुकडे गँगबरोबर तुम्ही जाता. हे पाहता राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. शरद पवारांनी तुमच्या डोक्यात सत्तेचा दिवा पेटवला. गळ्यात गळा घालणारे तुमचा गळा कधी दाबतील याचा नेम नाही. तुम्हाला सत्तेचा मोह झाला. खुर्चीचा मोह झाला. यासाठीच तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केलात. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, पण आम्ही गद्दार नाही तर खुद्दार आहे. बेईमानी आमच्या रक्तात नाही. हा 'शिंदे' आहे. सत्तेसाठी 'मिंधे' होणारा नाही,असेही ते म्हणाले.

आमच्यावर खोके घेतले असा आरोप केला जातो. पण आजपर्यंत आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो आहोत. याच भावनेने आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. संघटनेसाठी आम्ही आत्तापर्यंत जिवाची बाजी लावली. आज माझ्यावर 109 केसेस आहेत. तुमच्यावर किती आहेत? रामदास कदमांनी कोकणात शिवसेना मोठी केली. त्याच भाईंना तुम्ही संपवायला निघालात ? योगेश कदम याची आत्ता राजकारणात सुरुवात होत आहे. त्याचीही राजकीय कारकीर्द संपवायला निघालात? हे सहन करण्याच्या पलिकडे आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातून सोन्यासारखी माणसे वर्षावर काम घेऊन येतात. त्यांना मी एक कप चहाही देवू शकत नाही का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मी मुख्यमंत्री झाल्यापासून वर्षा बंगला सर्वांसाठी खुला आहे. मी सत्तेचा गर्व केला नाही. कधीही करणार नाही. ध्यानीमनी नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी मला मुख्यमंत्री केले. मी फिरणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून कारभार करणारा नाही. दिल्लीत जावून मी कोट्यवधीची निधी आणला. दाओस येथे आम्ही राज्यासाठी 147 हजार कोटीचे एमओयु केले. मोदींनी अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल्स पार्कला परवानगी दिली. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा विकास महत्वाचा आहे.

मी रात्रंदिवस काम करतो. अधिकार्‍यांना रात्री उशीरासुद्धा फोन करतो. तो ते फोन उचलतात. कारण त्यांना माहिती आहे की, हे मुख्यमंत्री रात्री उशीरापर्यंत काम करणारे मुख्यमंत्री आहेत. अर्थसंकल्पानंतर या अर्थसंकल्पातून गाजर हलवा मिळाला असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण आम्ही गाजर हलवा तरी दिला. तुम्ही गाजर हलवून दाखवित राहिलात, असा टोलाही त्यांनी हाणला. आमचा अजेंडा सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा आहे.

कोयना प्रकल्पातून समुद्रात वाहून जाणारे 64 टीएमटी पाण्यासंदर्भात तातडीने बैठक घेणार आहोत. खेड – पोयनार सिंचन प्रकल्पाला 243 कोटी दिले. न्यु मांडवा सिंचन प्रकल्पालाही लवकरच मान्यता मिळाले. लघु व मध्यम सिंचन प्रकल्पांचे लवकरच पुनरुजीवन करु असेही ते म्हणाले. खेड येथील 43 कोटींची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली असून तिचे काम लवकरच सुरु करणार आहोत. कोकणसाठी मरीन प्रकल्प, क्रीडा संकूल साकारत आहोत. आंबवडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कुणबी भवन, अल्पसंख्याक भवन यासाठी प्रत्येकी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. काजू बोंड प्रक्रिया प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यात येत असून त्यासाठी 5 वर्षात 1375 कोटी खर्च करणार आहोत. आंबा प्रक्रिया प्रकल्प, त्यांचे मार्केटिंग यासाठी तरतुद करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळासारख्या संकटांना तोंड देण्यासाठी व नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मच्छीमार, पर्यटन यासाठी विशेष प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.

मुंबई – गोवा महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. मुंबई ग्रीन फिल्ड महामार्ग, सागरी महामार्ग हेही लवकरच मार्गी लावण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. यातून पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल, असेही ते म्हणाले. मंडणगड येथे एमआयडीसी आणणार आहोत. हे सरकार देणारे सरकार आहे. बाळासाहेब जसे कोकणच्या जनतेच्या सोबत ठामपणे उभे राहिले, तसेच आम्हीही राहू. कोकणच्या जनतेला वार्‍यावर सोडणार नाही. त्यांनी या सभेतून कोकणसाठी झुकते माप दिले आहे.

नाव गेले की परत येत नाही

सत्ता येते सत्ता जाते. पैसा येतो पैसा जातो; पण नाव गेले की ते परत येत नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून तुम्ही नाव घालवले आहे. त्याच विचारावर चालत शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

आताचे सरकार अलर्ट मोडवर

महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. हे सरकार घरातून कारभार करणारे नाही. हे सायलेंट मोडवरील सरकार नसून अलर्ट मोडवरील सरकार आहे. गेल्या 9 महिन्यांत आम्ही खूप निर्णय घेतले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT