Latest

Konkan : कोकणात मुलींचा जन्मदर वाढला

backup backup

ठाणे : अनुपमा गुंडे

मुलींच्या शिक्षणाचे वाढते प्रमाण, लोकजागृती, शासकीय योजना, समाजात मुलींच्या यशाचा चढता आलेख, समाजाचा मुलींच्या जन्माकडे बघण्याचा बदलत चाललेला द़ृष्टिकोन आणि समृद्ध कोकणात मुलीला हुंडा देण्याची प्रथा नसल्याने कोकणात मुलींचा जन्मदर वाढल्याचे सकारात्मक चित्र गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. मुलीचा जन्म म्हणजे लक्ष्मीच घरात प्रवेश करते, असे कोकणात सावर्वत्रिकपणे मांडले जाते. त्याचाही सकारात्मक परिणाम जन्मदरात झाला आहे.

कुटुंबाची आर्थिक उन्नती मुलीकडून होईल, त्याबरोबरच कोकण प्रांत हा श्रद्धाळू असल्याने स्त्रीला तेवढेच महत्त्वाचे स्थान दिले आहे. मुलीला दान म्हणून दिले जाते, हा लग्नाचा संस्कार आहे. त्यामुळे हुंडा घेणे ही प्रथा कोकणात नाही. कोकणातील मुलींनी दहावी, बारावी परीक्षेमध्ये अव्वल स्थान राखून आपली यशस्विताही सिद्ध केली आहे. मुलींच्या या एकूण सकारात्मक द़ृष्टिकोनाचा परिणाम गेल्या दहा वर्षांमध्ये जन्मदर वाढण्यात झाला आहे.

कोकणात मुलींचे लग्न करताना हुंडा द्यावा लागत नसल्याने स्त्री-भ्रूणहत्या प्रकारांना बर्‍याचअंशी आळा बसला आहे. स्त्री-भू्रणहत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध पातळ्यांवर मोहिमा राबविल्या आहेत. सोनोग्राफीचा वापर करताना स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी विशेष आचारसंहिताही लागू केली आहे, या सर्वांचा हा परिपाक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

2013 ते 2018 या वर्षांत केवळ 2015 चा अपवाद वगळता तालुक्यांतील एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर सरासरी 850 च्या आसपास होता. 2015 साली हाच जन्मदर 900 च्या पुढे गेला होता. चालूवर्षीच्या जून महिन्याच्या

अखेरीस मुलींचा जन्म दर एक हजार मुलांच्या मागे 954 च्या घरात गेला आहे. गेल्या काही वर्षांत स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात उचलण्यात आलेल्या ठोस उपाययोजनांमुळे हा जन्म दर वाढला असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही वर्षांत अनेकांनी मुलगाच हवा, या हट्टापायी गर्भलिंग निदान चाचणीचा आधार घेत गर्भपात केल्याने मुलींचा जन्म दर चांगलाच खालावला होता. लोकजागृती व सरकारच्या आरोग्य विभागाने या विषयावर केलेल्या उपाययोजना व कठोर कारवायांमुळे मुलींचा जन्म दर वाढीस लागला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात जाऊन आरोग्यसेविका गर्भवती स्त्रीची नोंद करून घेते. संबंधित महिलेला लोहयुक्त गोळ्या देणे, आहार कोणता घ्यावा, याचा सल्ला देण्याबरोबरच पाच तपासण्या करत प्रसूती घरी न करण्याचा सल्ला देण्याबरोबरच प्रसूती नेमकी कोठे केली, यावर लक्ष ठेवले जात आहे. परिणामी, गर्भपात करणेही अशक्य बनले आहे. त्यातही ज्यांना दोन मुली आहेत अन् ती स्त्री पुन्हा गरोदर असल्यास विशेष लक्ष दिले जात असल्याने मुलींचा जन्म दर वाढत असल्याचे दिसून येत आहे. सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत एक मुलगी असल्यास दहा, तर दोन मुली असल्यास 20 हजार रुपये सरकार देत असल्याने त्याचाही फायदा मुलींचा जन्म दर वाढण्यास झाला आहे.

2013 मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण एक हजार मुलांमागे फक्त 900 होते, 2013-2014 मध्ये हे प्रमाण 914 वर गेले; पण 2015 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 907 इतके झाले होते. 2016 आणि 2017 मधील जन्मनोंदणीचे प्रमाण अनुक्रमे 904 आणि 913 आहे. 2018 च्या अहवालानुसार, हे प्रमाण 916 झाले होते. महाराष्ट्रातील शहरी भागात हजार मुलांमागे मुलींची संख्या 920 होती. जी राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या एका वर्षाच्या कालावधीमध्ये 6 हजार 280 बालकांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये 3 हजार 216 मुले, तर 3 हजार 64 मुलींचा समावेश आहे. या वर्षभरामध्ये जन्मलेल्या बालकांमध्ये मुले व मुलींच्या जन्माचे प्रमाण पाहता मुलांच्या जन्मापेक्षा 152 एवढ्या मुली कमी जन्मल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गतवर्षी जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत एकूण 7,255 एवढ्या नवजात बालकांचा जन्म झाला होता. तर जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या वर्षात 6,280 नवजात बालकांचा जन्म झाला आहे. 975 एवढी बालके कमी जन्मली आहेत. यावरून जिल्ह्याचा जन्म दर घटल्याचे स्पष्ट होत आहे. गतवर्षी 2020 मध्ये 3,792 मुले व 3,464 मुलींचा जन्म झाला होता. तर 2021 मध्ये 3,216 मुले व 3,064 मुली जन्मल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत 975 एवढी बालके कमी जन्मली असून, मुलांपेक्षा केवळ 152 एवढ्याच मुली कमी जन्मल्याचे दिसून येते, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलींच्या जन्म प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच जानेवारी ते मार्च 2022 या तीन महिन्यांत 726 मुले व 778 मुलींचा जन्म झाला आहे. यामध्ये मुलांपेक्षा 52 एवढ्या मुली अधिक जन्मल्या असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, गर्भलिंग व प्रसूतीपूर्व तंत्रनिदान कायद्याची (पीसीपीएनडीटी) कडकपणे अंमलबजावणी सुरू आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई सुरू आहे. राज्यात सात हजार सोनोग्राफी केंद्रे असून, लिंग निदान झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सोनोग्राफी केंद्रांसह गर्भपात केंद्रांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर गर्भपातांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन गुप्तपणे लिंगनिदान केल्या जाणार्‍या सोनोग्राफी केंद्रांची माहिती दिल्याने अशा केंद्रांवर कारवाई करून गर्भपाताला आळा घालणे शक्य होत आहे.

रत्नागिरीत समसमान, तर सिंधुदुर्गात मुलींचा जन्मदर जास्त

रायगड जिल्ह्यात यापूर्वी मुलींचा जन्मदर 1 हजार मुलांमागे 807 एवढा होता, तो आता 977 पर्यंत वाढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर जास्त आहे. 1 हजार मुलांमागे 1,077 पर्यंत मुलींचा जन्मदर आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यातही मुलींचा जन्मदर जवळपास समान आहे. ठाणे जिल्ह्यात 1 हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 924 आहे.

SCROLL FOR NEXT