Latest

KKR vs SRH : केकेआरचा निसटता विजय

Arun Patil

कोलकाता, वृत्तसंस्था : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR vs SRH) सनरायजर्स हैदराबादवर 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला. केकेआरच्या 208 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची धावगती सुरुवातीला खूपच कमी होती. शेवटच्या 24 चेंडूंत त्यांना विजयासाठी 76 धावांची गरज होती. येथून पुढे हेन्रिच क्लासेन आणि शाहबाज अहमद यांनी केकेआरच्या गोलंदाजीची पिसे काढत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडले. शेवटच्या पाच चेेंडूंत 7 धावा करण्याचे सोपे आव्हान असताना बाजी पलटली.

गोलंदाज हर्षित राणाने चतुराईने गोलंदाजी करीत शाहबाज अहमद आणि क्लासेन या दोघांना बाद करीत सामना केकेआरला जिंकून दिला. शेवटच्या चेंडूवर हैदराबादला षटकाराची गरज असताना कोट्यवधी किंमत लावून संघात घेतलेला कर्णधार पॅट कमिन्सच्या बॅटलाही बॉल लागला नाही. क्लासेनने क्लासिक खेळी करीत 29 चेंडूंत 63 धावा चोपल्या. तर अहमदने 5 चेंडूंत 16 धावा केल्या. त्यांचा डाव 20 षटकांत 7 बाद 204 धावांवर थांबला.

तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सुरुवातीला सार्थ ठरतोय असे वाटले; परंतु रसेल नावाच्या वादळाने कमिन्सचे गणित बिघडवले. रसेलने 25 चेेंडूंत 64 केलेल्या धावांमुळे केकेआरने हैदराबादला विजयासाठी 209 धावांचे तगडे आव्हान दिले.

केकेआर संघाकडून सुरुवातीला फिल साल्ट (54) आणि रमनदीप सिंग यांनी शानदार खेळी केली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या वादळाने हैदराबादच्या गोलंदाजांना धू-धू धुतले. केकेआरकडून फिल साल्टने (54) धावा केल्या, तर सुनील नरेन (2), व्यंकटेश अय्यर (7), श्रेयस अय्यर (0), नितीश राणा (9), रमनदीप सिंग (35), रिंकू सिंग (23) आणि आंद्रे रसेलने नाबाद 64 धावा केल्या. केकेआरने निर्धारित 20  षटकांत 7 बाद 208 धावा केल्या. रसेलने 7 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 25 चेंडूंत 64 धावा कुटल्या.

आंद्रे रसेलने केवळ 20 चेंडूंत सहा षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या वादळी खेळीसमोर हैदराबादच्या कोणत्याच गोलंदाजाचा टिकाव लागला नाही. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक धावा दिल्या. त्याला एकही बळी घेता आला नाही. भुवीने त्याच्या निर्धारित 4 षटकांत 51 धावा दिल्या, तर मार्को जान्सेन (40), पॅट कमिन्स (32), मयंक मार्कंडेय (39) आणि नटराजनने (32) धावा दिल्या.

संक्षिप्त धावफलक (KKR vs SRH)

कोलकाता नाईट रायडर्स : 20 षटकात 7 बाद 208. (फिल सॉल्ट 54, आंद्रे रसेल नाबाद 64, रणदीप सिंग 35. टी. नटराजन 3/32.)
सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकात 7 बाद 204. (मयंक अग्रवाल 32, अभिषेक शर्मा 32, हेन्रिच क्लासेन 63. हर्षित राणा 3/33, आंद्रे रसेल 2/25.)

SCROLL FOR NEXT