Latest

कोल्हापुरी चप्पलला मिळणार ‘क्यूआर कोड’

Arun Patil

मुंबई : व्यक्तिमत्त्वाला नवा रुबाब देणारी, पायाला आराम देतानाच दीर्घकाळ टिकणारी चप्पल म्हणून कोल्हापुरी चप्पल ओळखली जाते. मात्र चपलांच्या बाजारात बोगस कोल्हापुरी चपलांचा वावर वाढल्याने ग्राहकांची फसवणूक होत असून मूळ कोल्हापुरी चपलेच्या विक्रेत्यांचेही नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी आणि आपण घेत असलेली चप्पल अस्सल आहे की नाही हे ग्राहकांना लगेच कळावे याकरिता आता राज्य सरकारतर्फे या चपलांना 'क्यूआर कोड' दिला जाणार आहे.

कोल्हापुरी चपलांना डिजिटल ओळखपत्र मिळणार असल्याने एका क्लिकवर चप्पलची संपूर्ण माहितीच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही चप्पल असली की नकली हे लगेच ओळखता येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे उत्पादित होणार्‍या चपलांना हा क्यूआर कोड दिला जाणार आहे. तो स्कॅन होताच त्यामध्ये ही चप्पल कुठे तयार झाली नि ती कोणत्या कारागिराने बनवली, चामडे कुठून आणले, ते कोणत्या प्राण्याचे आहे, आदी तपशील क्यूआर कोडद्वारे ग्राहकांना मिळणार आहे. ही माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली.

खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापुरी चप्पलला (जीआय टॅगिंग) भौगोलिक संकेत नोंदणी प्रमाणपत्र यापूर्वीच प्राप्त झालेले आहे. ग्राहकांना असली आणि चांगली कोल्हापुरी चप्पल मिळावी यासाठी आम्ही कोल्हापुरी चप्पलला क्यूआर कोड देणार आहोत, अशी माहिती गजभिये यांनी दिली.

कोल्हापूरची शान

कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत एखाद्याचा उद्धार करण्यासाठी, करकर आवाज करत आपल्या व्यक्तिमत्त्चाचा रुबाब वाढविण्यासाठी किंवा एखाद्याचा रुबाब उतरविण्यासाठी कोल्हापुरी चप्पलचे नाव पुरेसे आहे. अतिशय जुनी आणि पिढीजात ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल म्हणजे कोल्हापूरची शान आहे. कोल्हापूर हे पारंपरिक वेशभूषेचे माहेरघर आहे. सण-समारंभात एरवी शेरवानी आणि सुटाबुटाच्या प्रेमात पडणारी तरुणाई कोल्हापुरी चप्पलही घालून दिमाखात मिरवताना दिसू लागली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोल्हापुरी चप्पलची मागणी वाढू लागली आहे.

SCROLL FOR NEXT