Latest

Kolhapur News | कोल्हापूर : शिक्षणावर भर देणारा जि.प. चा अर्थसंकल्प

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिक्षणावर भर देणार्‍या जिल्हा परिषदेच्या सन 2024 -25 च्या 39 कोटी 60 लाख 96 हजार 67 रुपये तरतुदीच्या मूळ अंदाजपत्रकास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. शिक्षणावर भर देण्याबरोबर पेपरलेस कार्यालय ई-ऑफिस संकल्पना राबविण्यासाठी या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे. बांधकाम विभागाच्या तरतुदीस यावर्षी कात्री लावण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संतोष पाटील यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. (Kolhapur News)

जिल्हा परिषद स्वनिधी व पाणी पुरवठ्याच्या देखभाल-दुरुस्ती निधीचे तसेच पंचायत समिती स्वनिधीचे सन 2023-24 चे अंतिम सुधारित 59 कोटी 66 लाख 83 हजार 643 रुपयांचे व सन 2024-25 च्या 39 कोटी 60 लाख 96 हजार 67 रुपयांच्या मूळ शिलकी अंदाजपत्रकास या सभेत मंजुरी दिली. सभेनंतर यासंदर्भातील माहिती प्रशासक संतोष पाटील यांनी पत्रकारांना दिली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे उपस्थित होते. (Kolhapur News)

शिक्षणासाठी 3 कोटी 7 लाख 30 हजारांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रातील एक याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या 174 शाळा आदर्श बनवून पालकांना एक चांगला पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुणात्मक तसेच भौतिक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये साहित्य, वाचनाची गोडी निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय शाळा देखभाल-दुरुस्तीसाठी 1 कोटी 50 लाख, शिक्षक मानधनासाठी 20 लाख, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी 20 लाख, प्रज्ञाशोध परीक्षेसाठी 14 लाख व जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी 4 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

'बांधकाम'साठी 3 कोटी 2 लाख 58 हजार

बांधकाम विभागासाठी 3 कोटी 2 लाख 58 हजारांची तरतूद करण्यात आली असून त्यासाठी प्रयोगशाळेकरिता 33 लाख, रस्त्यांसाठी 60 लाख, शिवराज्याभिषेक सोहळा समारंभासाठी 6 लाख व जिल्ह्यातील स्मारकांसाठी 10 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

कृषी विभाग 2 कोटी 12 लाखांची तरतूद

कृषी विभागासाठी 2 कोटी 12 लाख 12 हजारांची तरतूद करण्यात आली असून त्यात सेंद्रिय शेतीसाठी 20 लाख, जलसिंचन साधनांसाठी 35 लाख, पाचट कुट्टी, मल्चर मशिन पुरवण्यासाठी 30 लाख,, पीव्हीसी पाईपसाठी 20 लाख, बायोगॅस बांधकाम अनुदानासाठी 50 लाख व मधुमक्षिका व्यवसायाला चालना देण्यासाठी 10 लाखांची तरतूद केली आहे.

समाज कल्याण विभाग 4 कोटी 8 लाख 67 हजार 300 ची तरतूद

मागासवर्गीय वस्तीमध्ये एलईडीसाठी 91 लाख, महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी साहित्य पुरविण्याकरिता 52 लाख, महिलांना शेती उपयोगी साहित्यासाठी 50 लाख मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी 49 लाख 57 हजार तसेच स्वयंरोजगाराची साधने पुरविणे 35 लाख, कमवा-शिका योजनेसाठी 11 लाखांची तरतूद केली आहे.

आरोग्य विभागासाठी 1 कोटी 3 लाख

मानधन तत्त्वावर इअचड वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नेमणुकीसाठी 30 लाखांची, ग्रामआरोग्य संजीवनीसाठी 20 लाख, श्वान, सर्पदंश लसीसाठी 30 लाख आणि स्वच्छ सर्वांगसुंदर दवाखाना योजनेसाठी 8 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागासाठी 70 लाख, महिला व बाल कल्याणसाठी 1 कोटी, 68 लाख 30 हजार, ग्रामपंचायत विभागासाठी 38 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यात मुलींना प्रशिक्षण देणे, सायकल पुरवणे, कुपोषित मुलांना अतिरिक्त आहार पुरविण्यासाठी तरतूद केली आहे. पशुसंवर्धन विभाग : 1 कोटी 51 लाख 72 हजारांची तरतूद केली आहे.

ई-पेपर ऑफिस

प्रशासनामध्ये गतिमानता आणण्यासाठी ई-ऑफिस पेपरलेस कार्यालय संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 14 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेला बक्षीस रूपाने मिळालेली सुमारे दीड कोटीची रक्कम यासाठी खर्च करण्यात येणार आहे.

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी 25 लाख

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी 2 कोटी 67 लाख 66 हजारांची तरतूद केली आहे. यात पंचंगगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी करण्यात येणार्‍या आराखड्याकरिता 25 लाखांची, तर डोंगराळ भागातील पाणीपुरवठ्यासाठी 40 लाखांची तरतूद केली आहे. पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर बंधारे दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी 40 लाखांची तरतूद केली आहे. संकीर्ण समावेश योजनेसाठी 6 कोटींची तरतूद केली आहे.

SCROLL FOR NEXT