Latest

Kolhapur violence : कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांची गय नाही – जिल्हाधिकारी रेखावार

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला. दंगलग्रस्त भागाची पाहणी जिल्हाधिकारी रेखावार यांनी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Kolhapur violence)

ते म्हणाले, शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापुरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहावे. नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे पसरणार्‍या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केलेे.

कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्मसमभावाचा आणि प्रगतिशील जिल्हा राहिला आहे. राजर्षी शाहू छत्रपतींचे कार्य, कर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेऊन आजवर कोल्हापूर जिल्ह्याने जगाला पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार दिला आहे. जगाला आदर्श विचार देणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. कोल्हापूरचा सामाजिक क्षेत्रातील ठसा कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध ः फुलारी

सोशल मीडियावरील अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. तसेच अनावश्यक घराबाहेर पडून गर्दीत भर घालू नये, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे. कोल्हापूरमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. परिस्थितीचा फायदा घेऊन लोकांना घाबरवणार्‍या व दंगा घडवून आणणार्‍या गुंडांना शोधण्यात येत असून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू राहणार आहे. झालेल्या नुकसानीची दखल घेऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

सध्या स्थानिक प्रशासनाकडून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी पालन करावे. पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना संरक्षण देण्यास पूर्णतः कटिबद्ध असून कोणतीही अडचण आल्यास स्थानिक पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे अथवा पोलीस प्रशासनाशी नागरिकांनी संपर्क करावा, असे आवाहन फुलारी यांनी केले आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.