Latest

कोल्‍हापूर : कागल, शिरोळ तालुक्यातील गावे आजपासून बंद ठेवून निषेध

अमृता चौगुले

दत्तवाड( कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : सुळकूड योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यान्वित होऊ द्यायची नाही या भूमिकेतून दूधगंगा बचाव कृती समितीच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनला विविध गावांनी समर्थन दिले आहे. या योजनेला मंजुरी देणाऱ्या प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी कागल व शिरोळ तालुक्यातील विविध गावांनी वेगवेगळ्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्‍यान, याची सुरुवात कागल तालुक्यातील सुळकूड येथून झाली असून मंगळवारी (दि.८) सुळकूड गाव बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच उद्या बुधवारी (दि. ९) रोजी दत्तवाड, नवे व जुने दानवाड, घोसरवाड, टाकळीवाडी आदी गावे कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. याशिवाय दि. १० रोजी कसबा सांगाव, दि. १२ रोजी मौजे सांगाव, रणदेवीवाडी गावेही बंद ठेवण्यात येणार आहेत.

इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने वारणा नदीतून अमृत योजना मंजूर केली. मात्र यामुळे वारणा नदी काठावर दूरगामी विपरीत परिणाम होणार ही बाब लक्षात येताच दानोळीकरांनी योजने विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन पुढाकार घेतला. त्याला बघता बघता पूर्ण वारणा नदी काठाने सर्व स्तरावर पाठिंबा दिला. त्यामुळे प्रशासनाला अमृत योजना गुंडाळावी लागली होती. त्यानंतर प्रशासनाने दूधगंगा नदीतून सुळकूड येथून अमृत २ योजना मंजूर केली. यालाही दूधगंगा नदी काठावरून तीव्र विरोध सुरू आहे. यासाठी दानोळीकरांची भूमिका शिरोळ तालुक्यातून दत्तवाड व कागल तालुक्यातील सुळकूडने घेतली आहे. यालाही नदीकाठावरील गावागावात बैठका घेऊन पाठिंबा मिळू लागला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सुळकुड योजना कार्यान्वित होऊ द्यायची नाही अशी ठाम भूमिका दूधगंगा बचाव कृती समितीने घेतली आहे.

१४ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन सोमवारी दूधगंगा बचा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात येणार असून सदर मोर्चेत कागल, शिरोळ, हातकलंगले, करवीर तालुक्यातील तसेच दूधगंगा नदी काठावरील कर्नाटकातील हजारोच्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. याबाबतचे निवेदन लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात येणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT