Latest

Kolhapur News | व्ही. बी. पाटील यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये : ए. वाय. पाटील

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात प्रचार करणार्‍या व्ही. बी. पाटील यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिले आहे. शरद पवार आमचे दैवत आहेत, त्यांनी अनेकदा आमच्यासमोर व्ही. बी. पाटील यांना खडसावलेही आहे, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (Kolhapur News)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मेळावा रविवारी कोल्हापुरात झाला. यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील व जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांची हकालपट्टी करण्याचा ठराव केला होता. यासंदर्भात जयकुमार शिंदे यांनी मुद्दा उपस्थित केला होता. हकालपट्टीनंतर ए.वाय.पाटील यांनी सोमवारी पत्रक प्रसिद्धीस दिले.

जाहीर सभेच्या निमित्ताने खा. शरद पवार कोल्हापुरात आले की, त्यादिवशी उपस्थित राहायचे. दुसर्‍या दिवसापासून विरोधात काम करायचे. 'व्ही. बी. पाटील तुम्ही बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा करू नका' असे पवार यांनीच म्हटले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली. आतापर्यंत त्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. यापुढेही न्यायदेवता त्यांना न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे झालेल्या मेळाव्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या मनात असलेला राज्याचा विकास, महाराष्ट्र राज्य देशात एक नंबरला आणण्याचे स्वप्न आणि राष्ट्रवादीचा विस्तार यासाठी आम्ही प्रामाणिकपणाने अजित पवार यांना साथ देऊ, असेही पत्रकात म्हटले आहे. (Kolhapur News)

SCROLL FOR NEXT