हुपरी : गेली दोन दशके शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद संभाळणारे मुरलीधर जाधव शनिवारी (दि. १७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात ५ हजार शिवसैनिकांसह प्रवेश करणार आहेत. माजी आमदार सुजित मिणचेकर आणि सुषमाताई अंधारे यानी माझ्याविरोधात नेत्यांचे कान भरले. त्यामुळे मातोश्री वरूनही दीड महीने झाले तरी कोणतही संपर्क नाही. त्यामुळे आपण नाराज होऊन हा निर्णय घेतल्याचे माजी जिल्हाप्रमुख, गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यानी सांगितले.
हुपरीतून भव्य रॅली काढून ५ हजार शिवसैनिक कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी येथे येतील. व तेथून भगवा झंझावात पदयात्रेने सभास्थानी जाईल, असे त्यानी सांगितले.
मी गेली 30 वर्षे शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख असा खडतर प्रवास केला. मात्र, ठाकरे गटाने जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर दीड महिने त्यांनी साधी चौकशीही केली नाही. मला बाजूला हो म्हटले असते, तर मी झालो असतो. मात्र हकालपट्टी करणे हे माझ्या सारख्या शिवसैनिकांला न पटणारे आहे. त्यामुळे काल राज़ीनामा दिला असल्याचे मुरलीधर जाधव यांनी सांगितले.
माझ्या विरोधात काम करणारे ठाकरे गटात भविष्यात रहाणार नाहीत, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. माझ्यासारख्या शिवसैनिकांची अशा पद्धतीने झालेली हकालपट्टी जिल्ह्य़ातील शिवसैनिकांना पटलेली नाही. हे उद्या पक्ष प्रवेशावेळी सर्वांना दिसेल. येत्या काही दिवसांत जिल्ह्य़ात शिवसेना शिंदे गट घराघरात आणि गावागावांत सर्वांना पाहायला मिळेल. गटाची ताकद वाढवण्यासाठी आपण रात्रीचा दिवस करू, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना त्यावेळी पक्षाची भूमिका म्हणून विरोध केला. पक्ष शिस्त आणि पक्ष आदेश माननारा मी कार्यकर्ता आहे. त्यांचे आणि माझे कोणतेही वैर नाही, असे त्यानी सांगितले. पक्षात कोणते पद मिळेल, म्हणून नव्हे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा जोपासण्यासाठी व सर्वसामान्यांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुध्द आवाज उठवण्यासाठी प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील, त्याप्रमाणे कार्यरत राहू, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, युवा नेते शिवाजीराव जाधव, संजय वाईगडे उपस्थित होते.
हेही वाचा