Latest

कोल्हापूर : गणेशमूर्तींसाठीच्या रंगांची बाजारपेठ 25 कोटींची

Arun Patil

कोल्हापूर, गौरव डोंगरे : कलेचे माहेरघर असणार्‍या कोल्हापूरची गणेशमूर्ती बाजारपेठ प्रसिद्ध आहे. अत्यंत सुबक आणि देखण्या गणेशमूर्ती येथे बनतात. या गणेशमूर्तींवरील रंगकामात वापरण्यात येणार्‍या रंगांची सर्वाधिक आवक मुंबईहून केली जाते. जिल्ह्यात दीड लाखावर घरगुती, तर सुमारे 50 हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आकार घेत आहेत. या मूर्तींसाठी अस्तर, वस्त्रे, अंगाचे भाग आणि दागिने अशा वेगवेगळ्या रंगांची आवश्यकता असते. रंगाच्या बाजारपेठेत सुमारे 25 कोटींची उलाढाल होते.

गणेशाचे रूप अधिक लोभस दिसावे, यासाठी वेगवेगळ्या शेडस् वापरल्या जातात. मूर्ती वॉश करणे, अंगाचा रंग, यानंतर अंगावरील वस्त्रे रंगविण्यात येतात. सर्वात शेवटी आभूषणे आणि आसनाला रंग दिला जातो. यामध्ये साधारणपणे डिस्टेंपर, इमर्शन, प्लास्टिक पेंट, पोस्टर कलर अशा रंगांचा समावेश आहे.

1 फूट मूर्तीला 400 रुपयांचा रंग

रंग हे तोळ्याच्या मोजमापापासून ते लिटरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोल्हापुरातील मूर्तिकारांकडून पर्यावरणपूरक अशा वॉटरबेस रंगांचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. पाण्यात सहजपणे विरघळणारे रंग वापरण्यात येत आहेत. मूर्तीचे फिनिशिंग झाल्यानंतर शरीराचा भाग रंगविण्यासाठी डिस्टेंपर, इमर्शन, अंगावरील वस्त्रांसाठी प्लास्टिक पेंट, पोस्टर कलर, असे रंग वापरण्यात येतात. शेवटी आभूषणे रंगविण्यासाठी सोनेरी रंगाचा वापर होतो. रंगांच्या किमती 25 रुपयांपासून 100 रुपये तोळा आहेत. 1 फुटी मूर्तीला 400 रुपयांपर्यंतचे रंग, तर 5 फुटी गणेशमूर्तीसाठी 2,000 रुपयांपर्यंतचा रंग आवश्यक असल्याचे मूर्तिकार श्रीधर कुंभार यांनी सांगितले.

कच्च्या मालाचे दर वाढले

सोनेरी रंग पूर्वीपेक्षा दुप्पट दराने मिळत आहेत. पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढल्याने रंगांसाठी वापरला जाणारा कच्चा मालही महागला आहे. याचा परिणाम म्हणून गणेशमूर्तींच्या दरातही वाढ होण्याची शक्यता असल्याचे रंग विक्रेते आनंदा कुंभार यांनी सांगितले.

रंगांऐवजी कापड, ज्वेलरीला मागणी

गेल्या काही वर्षांत पितांबर कापडाचे वापरण्यात येते. किरीटसह इतर दागिन्यांसाठी ज्वेलरीचा वापर केला जातो आहे. पाऊण फुटापासून अडीच फुटांपर्यंतच्या घरगुती दीड लाखावर, तर सार्वजनिक मंडळांच्या 3 फुटांपासून 21 फुटांपर्यंतच्या पन्नास हजारांवर गणेशमूर्ती घडत आहेत. घरगुती गणेशमूर्तींसाठी 6 कोटींचा, तर सार्वजनिक मूर्तींसाठीही 20 कोटी रुपयांचा रंग लागेल, असा अंदाज आहे.

SCROLL FOR NEXT