Latest

कोल्हापूर लोकसभा निवडणूक : खासबाग मैदानात हलगीचा कडकडाट!

Arun Patil

महाराष्ट्रात कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक कायमच लक्षवेधी असते. प्रारंभी तत्कालीन खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्या कार्यकाळात हा सामना एकतर्फी होता. परंतु, 1998 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर मात्र काटाजोड लढतीने ही लढत राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या जनतेसाठी उत्कंठापूर्वक ठरते आहे. या लोकसभेचे मैदान मुकर्रर झाले आहे. यासाठी कोल्हापूरचे शाहू खासबाग मैदान सजले आहे. गेले काही दिवस या मैदानाचे आखाडा पूजन सुरू होते. आता कुस्तीला सुरुवात होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीने कोल्हापूरच्या गादीचे वारस छत्रपती शाहू महाराज यांना आखाड्यात उतरविले आहे, तर दुसर्‍या बाजूला महायुतीतर्फे विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक यांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. खरेतर ही लढत 'गादी विरुद्ध मोदी' अशी आहे. या लढतीत कोल्हापूरची जनता कोणाच्या पाठीवर तांबडी माती टाकण्याची भूमिका घेते, यावर कोल्हापूरच्या विकासाचे भवितव्य अवलंबून आहे.

शाहू खासबाग मैदानात हलगी वाजू लागली, की प्रतिस्पर्धी मल्लांच्या पाठीराख्यांनी गटाने मैदानातील जागा काबीज करण्याची प्रथा आहे. यानुसार लोकसभेच्या मैदानात छत्रपती शाहू महाराज यांनी पायाला पट्टी बांधून उतरण्याची इच्छा व्यक्त करताच प्रतिस्पर्धी कोण, हा प्रश्न ताणला गेला होता. महायुतीनेही अकारण हा प्रश्न ताणत ठेवला. गतवेळी विक्रमी मतांनी निवडून आलेल्या मंडलिकांची उमेदवारी तत्काळ जाहीर करून टाकली असती, तर एव्हाना ते कामालाही लागले असते. पण पक्षीय राजकारणात पक्ष धुरिणांसाठी उमेदवारांना निवडणूक हीच वाकविण्याची नामी संधी असते. यामुळेच मंडलिकांना मुंबई-दिल्लीच्या वार्‍या कराव्या लागल्या. वारंवार मीच उमेदवार म्हणून सांगण्याची वेळ त्यांच्यावर आणली गेली आणि इतकेच काय, स्वतंत्र म्हणूनही रिंगणात उतरावे लागेल, असा कार्यकर्त्यांकरवी इशाराही देण्याची वेळ त्यांच्यावर आली. सरतेशेवटी मंडलिकांच्या नावावर महायुतीने शिक्कामोर्तब केले असले, तरी उमेदवारी जाहीर करण्यात झालेला कालहरणाचा कालावधी भरून काढण्याची जबाबदारीही युतीच्या नेत्यांवर असणार आहे.

कोल्हापूरचे छत्रपती शाहूंचे घराणे मितभाषी आणि संयमी म्हणून ओळखले जाते, तर मंडलिक घराणे आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे. याच आक्रमकतेतून खासदार सदाशिवराव मंडलिकांनी कागलची आमदारकी विक्रमसिंहराजेंकडून हिसकावून घेतली आणि जेव्हा शरद पवारांशी त्यांचे बिनसले, पवारांनी सदाशिवरावांची 'बशाबैल' म्हणून हेटाळणी केली, तेव्हा अपमानाने पेटून उठलेल्या मंडलिकांनी खुद्द पवारांनाच धडा शिकविला. अपक्ष म्हणून लोकसभेला पवारांच्या व्यूहनीतीला चारीमुंड्या चीत करणारे पैलवान म्हणून मंडलिक जगभरातील मराठी माणसांत गाजले. त्यांना आरत्या घेऊन ओवाळण्यासाठी दिल्लीच्या विमानतळावर काँग्रेस श्रेष्ठी आले होते. या लढतीत मंडलिकांनी छत्रपती घराण्याचे युवराज संभाजीराजे यांचा पराभव केला होता.

आता छत्रपती घराण्याबरोबर संघर्षाचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. पहिली लढाई मंडलिक विरुद्ध युवराज अशी झाली. आता मंडलिकांच्या पुत्राविरुद्ध लढण्यासाठी खुद्द छत्रपती आखाड्यात उतरले आहेत. गतनिवडणुकीत संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. त्यावेळी मंडलिकांच्या पाठीशी सतेज पाटील यांची फौज आणि रसदही उभी होती. मध्यंतरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. महाडिकांनी राष्ट्रवादी सोडली आणि राज्याच्या सत्तांतरात मंडलिकांनी महाविकास आघाडी सोडली. यामुळे आता राजकारणात खांदेपालट झाले असून, छत्रपतींच्या मागे सतेज पाटील, तर मंडलिकांच्या मागे धनंजय महाडिक उभे असल्याचे चित्र आहे. यामध्ये दोन्ही युवा नेते किती चोख भूमिका बजावतात, यावर निवडणुकीची रंगत अवलंबून असेल.

1989 साली दिल्लीत कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी मागण्यासाठी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय काँग्रेस मुख्यालयात गेले होते. त्यावेळी उदयसिंहराव गायकवाड यांना श्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला. यामुळे राजकारणापासून काहीसे दूर असलेल्या छत्रपतींनी समाजकारणाचा रस्ता पकडला होता. 1997 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. युवराज संभाजीराजे यांच्या पराभवानंतर तर छत्रपती मैदानात उतरणार नाहीत, अशी अटकळ बांधली गेली होती. परंतु, विरोधी पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्यानंतर काटाजोड उमेदवार म्हणून पवारांनी महाराजांना वयाच्या 76 व्या वर्षी लंगोट बांधणे भाग पाडले. त्यासाठी शिवसेनेची जागा काँग्रेससाठी सोडावयास लावण्याची महाराजांची अटही मान्य केली. आता महाराज प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यांचे मानकरी, कार्यकर्ते घराघरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताहेत. सोशल मीडियावर संदेश फिरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची जनता गादीच्या पाठीमागे राहते, की मोदींना लोकसभेत हॅट्ट्रिक करण्यासाठी सोबत करते, हे येणारा काळच स्पष्ट करेल.

लोकसभा निवडणुकीनंतर बरोबर सहा महिन्यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीत अनेक मातब्बरांना आपले स्थान टिकवायचे आहे. शिवाय, उत्तम कामगिरीची अट घातली गेल्यामुळे त्यांना आपले मेरिटही दाखवावे लागणार आहे. यामुळे लोकसभा मतदार संघाचा विचार केला, तर कागदावर मंडलिकांचे पारडे जड दिसते आहे. चंदगडमध्ये त्यांचे मेहुणे राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत, तर गडहिंग्लज, आजरा, कागल या सुभ्यावर मंत्री हसन मुश्रीफ मांड ठोकून बसले आहेत. कागल ही घाटगे घराण्याची जहागिरी समजली जाते.

समरजितसिंह घाटगे राजकारणाच्या नव्या रचनेत किंचितसे नाराज आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धीच भाजपच्या वळचणीला आल्याने त्यांची पंचाईत झाली असली, तरी आगामी भवितव्यासाठी त्यांना कागलच्या मतदारांची जहागिर मंडलिकांच्या मागे उभी करावी लागेल. भुदरगडात आबिटकरांना नेतृत्वाचा कस लावावा लागणार आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांना आणि दक्षिणमध्ये महाडिक गटाला मेरिट दाखवावे लागेल. आता महाराजांची बाजू शहरात व करवीरमध्ये सतेज पाटील व पी. एन. पाटील यांच्यामुळे येथे वाढून जाईल. अर्थात, कागदावरचा हा सरंजाम प्रत्यक्ष मतपेटीत कसा उतरतो, यावर बरेच काही अवलंबून आहे आणि खुद्द छत्रपतीच उभे राहिल्याने मंडलिकांनाही पायाला भिंगरी बांधावी लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT