Latest

कोल्हापूर : ‘जयप्रभा’च्या सरकारी जागेची विक्री बेकायदेशीर

backup backup

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : जयप्रभा स्टुडिओच्या सरकारी जागेची बेकायदेशीर विक्री केल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. या तक्रारीवर जिल्हाधिकार्‍यांनी सह-जिल्हा निबंधक वर्ग 1, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक आणि करवीरचे प्रांताधिकारी यांना शुक्रवारी नोटीस बजावली.

याप्रकरणी स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश या नोटिसीद्वारे देण्यात आले आहेत. जागा मालक म्हणून लता दीनानाथ मंगेशकर यांच्यातर्फे नोंदणीकृत वटमुखत्यारधारक म्हणून उषा दीनानाथ मंगेशकर यांनी खरेदीपत्र करून दिले आहे. ही जागा श्री महालक्ष्मी स्टुडिओज एलएलपीतर्फे प्राधिकृत भागीदार सचिन श्रीकांतराव राऊत यांनी खरेदी घेणार म्हणून खरेदीपत्रावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. 6 कोटी 50 लाख रुपयांना हा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला आहे. या प्रकरणाने जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

10 भागीदारांकडून खरेदी

ही जागा खरेदी करणार्‍या श्री महालक्ष्मी स्टुडिओज एलएलपी या कंपनीचे दहा भागीदार आहेत. यामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची दोन मुले ऋतुराज राजेश क्षीरसागर आणि पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्यासह श्रीकांत राऊत, महेश अमृतलाल बाफना-ओसवाल, सय्यम नरेंद्रकुमार शहा, हितेश छगनलाल ओसवाल, पोपटलाल खेमचंद शहा-संघवी, राजू रोखडे, रौनक पोपटलाल शहा-संघवी आणि आदिनाथ शेट्टी यांचा समावेश आहे.

देसाई यांनी याबाबत दि. 19 एप्रिल रोजी तक्रार दिली आहे. सरकारी जागेची विक्री केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांसह खरेदी देणार आणि घेणार यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीतून विक्री झालेली ही जागा सरकारी असल्याचे स्पष्ट होत असल्याचे देसाई यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

जयप्रभा स्टुडिओची कोल्हापूर महापालिका हद्दीतील सि. स. नं. 2814/क/1 आणि 2814/ग/1 या दोन जागेचे दि. 15 फेब—ुवारी 2020 रोजी दुय्यम निबंधक वर्ग 2 करवीर क्रमांक चार यांच्याकडे खरेदीपत्र झाले आहे. या दोन्ही मिळकती एकाच या खरेदीपत्राच्या दस्त नोंदणीद्वारे खरेदी-विक्री करण्यात आल्या आहेत. या खरेदी दस्ताचा क्रमांक 580/2020 असा आहे. खरेदी-विक्री झालेल्या सि. स. नं. 2814/ग/1 या जागेची मालमत्ता पत्रकावर 'कोल्हापूर सिनेटोन सरकारी' अशी नोंद आहे. यामुळे या जागेची खरेदी-विक्री करण्यापूर्वी सरकारी परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ही खरेदी-विक्री झाली आहे. त्यातच दोन मिळकतींचे एकच खरेदीपत्र करण्यात आले आहे. हे खरेदीपत्र कायद्यातील तरतुदीविरोधी आहे. यामुळे ही मिळकत सरकारी कब्जात घ्यावी, असे देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे.

उषा मंगेशकर यांची फेरफार नोटिसीवर बोगस सही ?

या खरेदी पत्राच्या आधारे नगर भूमापन कार्यालयात फेरफार नोंद करण्यात आली आहे. अर्जदाराने केलेल्या अर्जावरील आणि प्रत्यक्ष फेरफार नोंदीवरील मिळकतीही वेगवेगळ्या आहेत. खरेदी देणार लता मंगेशकर यांच्यातर्फे वटमुखत्यार उषा मंगेशकर यांचीही फेरफारवरील स्वाक्षरी बोगस असल्याचा संशय आहे. शासकीय जमिनीची बेकायदेशीर विक्री झाली आहे. याप्रकरणी परवानगी आवश्यक असतानाही ती न घेता खरेदीपत्र झाले. तसेच एका खरेदीपत्राआधारे दोन फेरफार नोंदी करून शासनाची फसवणूक केली असल्याने दुय्यम निबंधक व नगरभूमापन अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देसाई यांनी अर्जात केली आहे.

देसाई यांच्या तक्रार अर्जावरून जिल्हाधिकार्‍यांनी सह-जिल्हा निबंधक वर्ग एक, भूमी अभिलेखचे जिल्हा अधिक्षक आणि करवीर प्रांताधिकारी यांना शुक्रवारी नोटीस बजावली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्या स्वाक्षरीने या नोटिसा संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

कोरोना काळात गुपचूप व्यवहार

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना, बहुतांशी सर्वत्र लॉकडाऊन असताना गुपचूपपणे 15 फेब—ुवारी 2020 रोजी हा खरेदी दस्त झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही अशा परिस्थितीत उषा मंगेशकर दस्त नोंदणीसाठी कोल्हापुरात आल्या होत्या. दस्त नोंदणी झाल्यानंतर राऊत यांनी फेरफार नोंदणीसाठी नगर भूमापन कार्यालयाकडे दि.20 फेब—ुवारी 2020 रोजी अर्ज केला होता. त्यावर नगर भूमापन कार्यालयाने 10 जून 2020 रोजी खरेदी घेणार व देणार यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 यांच्या कलम 150(2) अन्वये फेरफार नोंदीची नोटीस काढली. यानंतर दि.3 जुलै 2020 रोजी ही फेरफार मंजूर करण्यात आला आहे.जयप्रभा स्टुडिओ बचावासाठी 76 दिवस आंदोलन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जयप्रभा स्टुडिओच्या जागेत जर मंगेशकर कुटुंबीयांनी जागा दिली तर लतादीदींचे स्मारक करू, अशी घोषणा केली होती. यानंतर दोन वर्षांपूर्वीच या जागेचा बाजार झाल्याचे समोर आले. ही जागा चित्रीकरणासाठी दिली होती. ती तशीच राहावी यासाठी रंगकर्मींनी सुरू केलेले आंदोलन 76 दिवसांपासून सुरूच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT