Latest

कोल्हापूर : घरफाळ्यात ‘सेटलमेंट’

Arun Patil

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहरात नव्याने बांधलेल्या आणि अद्यापही घरफाळा लागू नसलेल्या इमारतींचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षणाचा निर्णय महापालिकेने घेतला. कर बुडव्यांना शोधून घरफाळा लागू करून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा उदात्त हेतू त्यामागे आहे. मात्र, काही अधिकारी व कर्मचारी त्याचा गैरफायदा घेत आहेत. सर्वेक्षणातून घरफाळ्यात थेट सेटलमेंट होत आहे. नव्या-जुन्याबरोबरच घरफाळा घोटाळ्यातील मिळकतींनाही रितसर करून दिले जात असल्याची चर्चा आहे. त्यामागे घरफाळा विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

वादग्रस्त मिळकतीही रितसर

कोल्हापूर शहरात 7 जूनपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांतर्गत पथके तैनात करण्यात आली आहेत. काही कर्मचारी घरफाळा लावून देण्यासाठी तसेच घरफाळा कमी करण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. महापालिकेच्या घरफाळा विभागात 2003 सालापासून घोटाळा सुरू आहे. काही वादग्रस्त व कारवाई होऊ शकणार्‍या मिळकतीही सर्व्हेतून रितसर करून घेतल्या जात असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी 2016-17 मध्ये एका खासगी कंपनीला सर्व्हेचे काम देण्यात आले. परंतु, या कंपनीच्या कर्मचार्‍यांनीही मोठ्या प्रमाणात सेटलमेंट करायला सुरुवात केली. तक्रारीनंतर कंपनीचे काम थांबवले. मात्र, त्या प्रकरणानंतरही महापालिकेने त्यातून धडा घेतला नाही. घरफाळा लावून देतो, म्हणून एका कर्मचार्‍याने एका मिळकतधारकाकडून 30 हजार घेतले. वारंवार तगादा लावल्यानंतरही घरफाळा लागू न केल्याने राजारामपुरी विभागीय कार्यालयातील घरफाळा ऑफिसमध्ये मोठा राडा झाला.

SCROLL FOR NEXT