Latest

सहा गावांसह हद्दवाढीचा निर्णय लवकरच : हसन मुश्रीफ

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरला लागून असलेल्या सहा गावांच्या हद्दवाढीचा निर्णय येत्या आठ दिवसांत होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे हद्दवाढ जाहीर करतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर इतर गावांच्या हद्दवाढीबाबत निर्णय होईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी प्रमुख उपस्थित होत्या.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गावांत महापालिकेच्या वतीने सेवा देण्यात येत आहेत. यात पाणी, केएमटीसह इतर नागरी मूलभूत सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे त्या सुविधांचा बोजा महापालिकेवर पुन्हा पडणार नाही. शहरातील जागेप्रमाणेच त्या गावातील जमिनीला भाव मिळत आहे. कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्याने उत्पन्नावर मर्यादा आहेत. मात्र खर्च अवाढव्य आहे. त्यामुळे त्या सहा गावांची हद्दवाढ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर त्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. लवकरच हद्दवाढीवर शिक्कामोर्तब होईल.

राजेश क्षीरसागर यांची समजूत काढू

थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली आहे. शहरातील रस्त्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यासह इतर विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ठरविले आहे. मात्र रस्त्यांची अवस्था वाईट आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा ठरण्यास वेळ लागेल. परिणामी रस्त्यांची कामे लवकर सुरू करण्यासाठी क्षीरसागर यांची समजूत काढू. नंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करू, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

शहरातील रस्ते होणार चकाचक

कोल्हापूर शहरात 1 हजार 100 कि.मी. रस्ते आहेत. शासनाकडून रस्त्यासाठी 100 कोटींबरोबरच जिल्हा नियोजन आणि इतर निधीही मंजूर झाला आहे. 88 रस्त्यांचा आणखी 90 कोटींचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आहे. त्यामुळे शहरातील रस्ते या निधीतून चकाचक होतील, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. कोल्हापूरसाठी केंद्र शासनाकडून 100 ई-बसेस मंजूर झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी या बसेस आल्यास शहरवासीयांना त्याचा फायदा होईल.

SCROLL FOR NEXT