Latest

कोल्हापूर : दहा मिनिटांत दहा-वीस हजारांची कमाई

Arun Patil

कोल्हापूर, अनिल देशमुख : खादा लॅपटॉप अथवा जुने पोर्टेबल मशिन, त्यावर अवघ्या दहा मिनिटांचे काम, त्याचा मोबदला दहा ते वीस हजार रुपये. एका मशिनवर इतक्या कमी वेळेत अधिक पैसे मिळत असल्याने गर्भलिंग निदान चाचणीचा गोरख धंदा जिल्ह्याच्या अनेक भागांत सुरू आहे. या धंद्याला मध्यमवर्गीयच मोठ्या प्रमाणात बळकटी देत असल्याचेही विदारक चित्र जिल्ह्यात आहे. धक्कादायक म्हणजे सोनोग्राफी केल्यानंतर गर्भ मुलीचाच असल्याचे सांगायचे, असा प्रकार सुरू आहे.

चौदा ते बावीस हजारांपर्यंत दर

14 ते 22 हजारांपर्यंत गर्भलिंग निदान चाचणीसाठी पैसे घेतले जात आहेत. त्यातील दोन हजारांपासून आठ-दहा हजारपर्यंत एजंटचे कमिशन असते, तर राहिलेली रक्कम सोनोग्राफी करणार्‍याला मिळते. एजंटच्या माध्यमातून गेलेल्या रुग्णांचीच सोनोग्राफी केली जाते. थेट कोणी गेले तर 'तो मी नव्हेच' असा आविर्भाव आणला जातो.

लॅपटॉप, पोर्टेबल मशिनचाच वापर

सोनोग्राफीची सध्या थ—ी-डी, फोर-डी स्कॅनिंग मशिन उपलब्ध आहेत. मात्र, गर्भलिंग चाचणीसाठी लॅपटॉप किंवा पोर्टेबल मशिनचाच वापर केला जातो. यामुळे छोटी खोली, मोठ्या वाहनाचा सोनोग्राफीसाठी सर्रास वापर केला जातो.

कारवाईला अनेक अडचणी

गर्भलिंग निदान चाचणी करताना रंगेहाथ पकडले तरच कारवाई होऊ शकते. मात्र, याकरिता स्टिंग ऑपेरशन करावे लागते. त्याकरिता काहीशी डॅशिंग आणि गरोदर महिला तयार व्हायला हवी. एजंटाचा विश्वास बसायला हवा. या सर्व प्रक्रियेला किमान एक-दीड महिन्याचा कालावधी लागतो. यानंतरच सापळा रचून कारवाई करता येते. प्रत्येक वेळी हे सर्व जुळून येईलच असे नाही. त्यामुळे गोरखधंदा करणारे माहीत असूनही त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होत नाही.

पैशासाठी सारेच गर्भ मुलीचे?

सोनोग्राफी करणारा प्रशिक्षित असलाच पाहिजे, असे नाही. त्यांना कोणताही अहवाल द्यायचा नसतो. मुलगा की मुलगी इतकेच सांगायचे असल्याने कोणीही आता गर्भलिंग चाचणी करू लागला आहे. लॅपटॉपवर सोनोग्राफी करत असलेला एक व्हिडीओ सुरू करायचा. प्रत्येक सोनोग्राफीच्या व्हिडीओवर सारखेच चित्र दिसते. महिलेला आपलीच सोनोग्राफी सुरू आहे, असे वाटते. पाच-दहा मिनिटे अ‍ॅक्टिंग करायची आणि थेट गर्भ मुलीचाच आहे म्हणून सांगायचे, यामुळे तत्काळ गर्भपात होतो आणि सोनोग्राफी खरोखर केली की नाही, याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यामुळे संबंधितांवर विश्वास ठेवून भोळ्या समजुतीने पोटातील गर्भाचा पात करण्याचे पातक अनेकांकडून होत आहे. पैशासाठी लोकांची निव्वळ फसवणूक सुरू आहे.

जिल्ह्यात एजंटांचे वाढते जाळे

गर्भलिंग निदान चाचणीसाठी एक रुग्ण मिळवून दिला की दोन हजारांपासून ते अगदी आठ-दहा हजारांपर्यंत घसघशीत कमिशन मिळते, यामुळे जिल्ह्यात अशा एजंटांचे जाळे वाढत चालले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील तरुण यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. स्थानिक ओळखीचा आधार घेत बेमालूमपणे गर्भलिंग निदान चाचणी करून देण्यात अनेकांचा हातखंडा आहे. गरजूचे काम करून द्यायचेही आणि आपण त्यातील कोणी नाही, केवळ तुम्हाला मदत केली, असे चित्र रंगविण्यात तरबेज असल्याने आपल्या अवतीभवती असूनही त्याचे खरे रूप समोर येत नाही.

आणखी चार टोळ्या रडारवर 

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :
राधानगरी व भुदरगड तालुक्यांत अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात करणार्‍या संशयितांना पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पोलिसांनी जिल्ह्यासह सीमाभागात अशा टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. आणखी चार टोळ्या पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

मंगळवारी (दि. 17) मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) व कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथे कारवाई करून चौघांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात आणखी चार मोठ्या टोळ्या कार्यरत असून, नावे निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी पोलिस मुख्यालयातील एका महिला कॉन्स्टेबलला संशयित टोळीकडे पाठविले होते. यानंतर या सर्व प्रकाराचा पर्दाफाश करण्यात आला. याप्रकरणी विजय लक्ष्मण कोळस्कर (वय 35, रा. मडिलगे खुर्द, ता. भुदरगड), दत्तात्रय कृष्णात पाटील (23, शिरसे, ता. राधानगरी) व सुनील रामचंद्र ढेरे (32, रा. आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी) या तिघांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून सोनोग्राफी मशिनसह 2 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर संशयित कोळस्करच्या राहत्या घरी 2 लाख 77 हजारांचे मशिन व साहित्य मिळाले होते.

SCROLL FOR NEXT