Latest

कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे दोन्ही जॅकवेल पूर्ण

Arun Patil

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहरवासीयांसाठी जिव्हाळ्याची असलेल्या थेट पाईपलाईनचे काम मार्गी लागले आहे. काळम्मावाडी धरण क्षेत्रात योजनेसाठी आव्हान ठरलेले अत्यंत महत्त्वाचे तब्बल 150 फूट खोली असलेले दोन्ही जॅकवेल पूर्ण झाली आहेत. लवकरच त्यावर स्लॅब टाकून पंप हाऊस बसविण्यात येणार आहे. मार्च 2023 पर्यंत कोल्हापूरकरांचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता आहे.

शुद्ध व मुबलक पाण्यासाठी योजना…

केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी कार्यक्रमांतर्गत 24 डिसेंबर 2013 ला कोल्हापूरकरांसाठी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. 488 कोटींची ही योजना आहे. 53.500 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या आहेत. कासवगतीने योजनेचे काम सुरू होते. गेल्या वर्षांपासून योजनेच्या कामाला गती आली आहे.

थेट पाईपालईन योजनेसाठी धरण क्षेत्रातील कामे महत्त्वाची आहेत. त्यात सुमारे 150 फूट खोल असलेल्या दोन जॅकवेलचा समावेश आहे. त्याबरोबरच धरण क्षेत्रात इंटेक वेल बांधण्यात येत आहे, तसेच इन्स्पेक्शन वेल 1, इन्स्पेक्शन वेल 2 असणार आहेत. इंटेक वेल, इन्स्पेक्सन वेल 1 व 2 मधून धरणातील पाणी दोन्ही जॅकवेलमध्ये सोडण्यात येणार आहे. तेथून जॅकवेलमधील पाणी ब—ेक प्रेशर टँकमध्ये सोडण्यात येणार आहे. या टँकमधून पाणी कोल्हापूर शहराकडे येईल. पुईखडी टेकडीवरील 80 एम. एल. डी. क्षमतेच्या वॉटर ट्रिटमेंट प्लँटमधून पाणी कोल्हापूर शहरात वितरित केले जाणार आहे. योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत आहे. परंतु, या कालावधीत योजना पूर्ण होणे अशक्य आहे.

योजनेची पूर्ण कामे…

  • पुईखडी येथे वॉटर ट्रिटमेंट प्लँट
  • ब्रेक प्रेशर टँक
  • 10 मीटर बाय 4 मीटर इंटेक वेल
  • जलवाहिन्या 53. 500 किलोमीटर
  • बटरफ्लाय व्हॉल्व्ह – 11
  • एअर व्हॉल्व्ह – 70
  • विद्युत वाहिनी – 24 किलोमीटर

अपूर्ण कामे…

  • इन्स्पेक्शन वेल 1 व 2
  • विद्युतीकरणाचे स्वीच यार्ड
  • ब्रेक प्रेशर टँकपर्यंत जलवाहिनी फाऊंडेशन

योजना द़ृष्टिक्षेपात

  • योजनेची किंमत – 488 कोटी
  • वर्कऑर्डर – 28-8-2014
  • पहिली मुदतवाढ – 31-5-2018
  • दुसरी मुदतवाढ – 31-12-2019
  • तिसरी मुदतवाढ – 31-12-2020
  • चौथी मुदतवाढ – 31-5-2022
  • पाचवी मुदतवाढ – 31-12-2022

कोल्हापूरसाठी 2.3 टीएमसी पाणीसाठा…

2011 च्या जणगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या 5 लाख 49 हजार आहे. 2045 ची प्रस्तावित लोकसंख्या 10 लाख 29 हजार इतकी गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार दैनंदिन 238 द. श. लि. इतकी पाण्याची गरज भासणार आहे. ही गरज ओळखून थेट पाईपलाईन योजना आखण्यात आली आहे. काळम्मावाडी धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 2.3 टी. एम. सी. (76.85 दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा कोल्हापूर शहरासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाने त्याची पूर्तता करून ठेवली आहे.

काळम्मावाडी धरण क्षेत्रातील दोन्ही जॅकवेलची कामे पूर्ण झाली आहेत. आता त्यावर पंप हाऊससाठी स्लॅब टाकण्यात येणार आहे. धरण परिसरातील ब्रेक प्रेशर टँकचे कामही संपले आहे. विद्युतीकरणासाठी स्वीच यार्डसह इतर उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

– हर्षजित घाटगे, जल अभियंता, महापालिका

SCROLL FOR NEXT