कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांना पुन्हा चांदीच्या उंबर्याजवळून (गाभार्यासमोर) मंगळवारपासून दर्शन घेता येणार आहे, गर्दीचे दिवस वगळता भाविकांना पूर्वीप्रमाणेच गाभार्याजवळून दर्शनाची सुविधा सुरू केल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले.
कोरोना कालावधीत अंबाबाई मंदिरासह गाभार्याजवळील चांदीच्या उंबर्यासमोरून सुरू असलेली दर्शन सुविधा बंद होती. दर्शन पुन्हा सुरू झाले. मात्र, पितळी उंबर्याजवळूनच दर्शन सुरू करण्यात आले. पूर्वीप्रमाणेच चांदीच्या उंबर्यापासून दर्शन करण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी भाविकांतून वारंवार होत होती. गर्दीचे दिवस वगळून उर्वरित दिवशी पूर्वीप्रमाणे दर्शन घेता येणार आहे. अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकासकामे केली जाणार आहेत. पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने ही कामे होणार असून लवकरच मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट झालेला दिसेल. कोल्हापूरला वेगळी झळाळी मिळेल, असेही केसरकर यांनी सांगितले.