Latest

Kolhapur Ambabai – आठ शक्तिपीठांपैकी ‘कोल्हापूरची अंबाबाई’

Arun Patil

कोल्हापूर : शाक्ता अष्टो च॥
ओघ्घीण -जाल- पूर्ण-काम- कोल्ल-श्रीशैल-कांची-महेंद्राः॥
एते महाक्षेत्रा:॥
सर्वसिद्धीकराश्च॥

(संदर्भ : बार्हस्पत्यसूत्रम्, अध्याय 3, सूत्रे 123-126)
करवीर निवासिनी अंबाबाईच्या घटस्थापनेपासून दसर्‍यापर्यंत भक्तिभावाने भारलेले वातावरण कोल्हापुरात असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना होते. नवरात्रकाळात मंदिरातील दीपमाळा पाजळल्या जातात. तोफेची सलामी देऊन घटस्थापनेची सुरुवात करण्याची प्रथा आजही कायम आहे.

दररोज पालखी सोहळा

मंदिरात फुलांनी सजवलेल्या पालखीतून दररोज रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणूक निघते. पायघड्या, उत्सवमूर्ती ठेवलेली पालखी, पुजारी, मानकरी असा लवाजमा पालखीमध्ये सहभागी होतो.

ललिता पंचमीला टेंबलाईच्या भेटीचा सोहळा

नवरात्रीतील ललिता पंचमीदिवशी अंबाबाई टेंबलाईच्या भेटीला जाते. टेंबलाईही करवीरनगरीची रक्षण देवता आहे. तिच्या भेटीसाठी सखी अंबाबाई, तुळजाभवानी यांच्या पालख्या मंदिरातून रवाना होतात. टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी थाटात साजरा होतो.

अष्टमीला महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा

अंबाबाईची दररोज वेगवेगळ्या रूपांत आकर्षक पूजा बांधली जाते. अष्टमीला देवीच्या जागरणाचा दिवस असतो. रात्री शेजारती होत नाही. कारण, देवी शयन करीत असते. यादिवशी देवीची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाते.

नवमीला होमहवन

नवमी हा नवरात्रीतील शेवटचा दिवस होय. महाकाली मंदिरासमोर होमहवन करून आहुती दिल्या जातात. दोन ते तीन तास चालणार्‍या या विधीची सांगता तोफेची सलामी देऊन नवरात्र उठते. हा दिवस खंडेनवमीचा असून पंरपरेप्रमाणे शस्त्रपूजन करण्यात येते.

SCROLL FOR NEXT