सरुड (कोल्हापूर), चंद्रकांत मुदूगडे : शाहूवाडी तालुक्यातील वरेवाडीतील एक साधा भाजी विक्रेता तरुण थेट सरपंच पदावर विराजमान झाला आहे. आनंदा रामचंद्र भोसले असे निवडणुकीत विजय मिळवलेल्या तरुणाचे नाव आहे. शिवसेनेचा (ठाकरे गट) कडवट आणि सच्चा सैनिक म्हणून आनंदा सुपरिचत आहे. दुर्गम डोंगरकपारीत वसलेल्या या वरेवाडीची ओळखच मुळात बाजार समितीला हमाल पुरविणारे गाव अशी आहे. यातून आनंदा भोसले हा तरुण भाजी विक्रेता बनला किंबहुना या व्यवसायात आला. बांबवडे परिसरात भोसले यांचे भाजी विक्रीचे दुकान आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक निकालात आनंदा भोसले याने जनसुराज्य पक्षाच्या विश्वास बाबू भोसले यांचा पराभव केला आहे. अर्थातच यापूर्वीही उपसरपंच म्हणूनही या तरुणाने कामाचा ठसा उमटवला आहे. आनंदा भोसले हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या प्रेरणेतून शिवसेनेशी जोडलेले कडवट शिवसैनिक. विशेष म्हणजे आनंद भोसले यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारिता कोर्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, पत्रकारितेच्या अनिश्चित विश्वाशी जुळवून घेण्यापेक्षा त्यांनी थेट भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच त्यांचा लोकांशी दांडगा संपर्क होऊ लागला. यातून समाजकार्य अंगी भिनले आणि आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गावाच्या सरपंचपदावर आनंदा भोसले विराजमान झाले आहेत.
आनंदा भोसले हे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सरपंच पदाच्या निवडणूक रिंगणात होते. त्यांना ३९१ मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभा राहिलेल्या विश्वास भोसले (जनसुराज्य शक्ती) यांना ३३० मते मिळाली. आनंद भोसले यांचा ६० मतांनी विजय झाल्याचे समजताच वरेवाडी सह बांबवडे पंचक्रोशीत ते कौतुकाचा विषय ठरले आहेत.