Latest

कोल्‍हापूर : महिलांना धमकावणाऱ्या गुंडाचा संतप्त जमावाकडून दगडाने ठेचून खून

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दौलतनगर येथील गुंड चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) याचा संतप्त जमावाने गल्ली-बोळातून पाठलाग करून खून केल्याचे रविवारी उघड झाले. यादवनगर येथील मध्यवर्ती चौकात झालेल्या खूनप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी सहा मारेकर्‍यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली आहे. पसार झालेल्या इतर सात संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. अभिषेक राजेंद्र म्हेतर (वय 22), शुभम दीपक कदम (22), अजय संजय कवडे (28), रोहन कृष्णात पाटील, सुधीर तुकाराम मोरे (21, सर्व रा. दौलतनगर), महेश मधुकर नलवडे (23, सायबर चौक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दादू पवारसह अन्य सात संशयित पसार झाले आहेत. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.

चिन्यासह साथीदारांची दहशत

दौलतनगरसह परिसर पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार चिन्या हळदकरच्या दहशतीखाली होता. निष्पापांच्या घरांवर दगडफेक, आलिशान मोटारीसह दुचाकींची तोडफोड, घरात घुसून तरुणांना मारहाण, महिलांना शिवीगाळ यासह गांजा तस्करीत गुंतलेल्या चिन्याची परिसरात प्रचंड दहशत होती. धारदार शस्त्रे बाळगून हल्ला करणारा गुंड म्हणून त्याला ओळखले जात होते.

महिलांना दाखवला चाकूचा धाक

शनिवारी रात्री उशिरा दौलतनगर येथील गल्लीत बोलत थांबलेल्या काही महिलांना कुख्यात गुंड चिन्याने चाकू दाखवून धमकावले. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली. काही तरुणांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शस्त्र उगारत चिन्या त्यांच्या अंगावर गेला. याच वादात एका रिक्षाची तोडफोड झाली. त्यानंतर परिसरातील तरुण संतप्त झाले. महिलाही धावून आल्या. जमाव प्रक्षुब्ध होताच चाकूचा धाक दाखवत त्याने यादवनगरच्या दिशेने अंधारातून पलायनाचा प्रयत्न केला.

मदतीसाठी चिन्याची याचना!

जीवाच्या आकांताने पळून जात असतानाही चिन्याने काही तरुणांसह महिलांना उद्देशून शिवीगाळ केल्याने तीव— पडसाद उमटले. तरुणांचा जमाव त्याच्यामागे लागला. जमावाच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी दौलतनगर, यादवनगर परिसरात तो गल्ली-बोळातून धावत सुटला. यादवनगर येथील चौकात संतप्त तरुण समोर दिसताच त्याने पुन्हा शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर मात्र जमावातील तरुण अधिक संतप्त झाले. त्यांनी चौकातून पाठलाग करताच 'वाचवा वाचवा' असे ओरडत चिन्याने मदतीची याचना केली.

दगडाने डोके ठेचले

भरचौकात मारेकर्‍यांनी चिन्याला गाठले. कमरेचा चाकू काढण्यापूर्वीच संशयितांनी त्याला गराडा घातला. रस्त्यावर ढकलून दिले. रस्त्यावर पडताच तरुणांनी त्याचे डोके दगडाने ठेचले. दगड, विटांनी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. जमावातील एका संशयिताने मोठा दगड डोक्यात घातला. त्यानंतर चिन्याची धडपड थांबली. रक्ताच्या थारोळ्यात चिन्या निपचित पडल्यानंतर मारेकरी तेथून पसार झाले.

चैनीसाठी चोरी अन् गुंडागर्दी

चिन्या ऊर्फ संदीप हळदकर मूळचा कोकणातील. 20 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आईसमवेत चिन्या व त्याचा भाऊ शुभम कोल्हापूर येथील मामांकडे वास्तव्याला आले. आई मोलमजुरी करून मुलांचा उदरनिर्वाह करीत होती. मात्र चिन्यासह भाऊ शुभमला दारू, गांजाचे व्यसन लागले. चैनीसाठी तो चोरीही करू लागला. दौलतनगर परिसरात त्याची गुंडागर्दी सुरू झाली. साथीदारांच्या मदतीने त्याने स्वत:ची दहशत वाढविली. 2017 मध्ये त्याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. सध्या त्याच्याविरुद्ध 14 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

शुभमला 'मोका' तर चिन्या 'तडीपार'

चिन्यासह त्याचा भाऊ शुभमचीही परिसरात दहशत वाढू लागली. खून, खुनाचा प्रयत्नांसह 15 ते 17 गुन्ह्याचे त्याच्याविरुद्ध रेकॉर्ड आहे. त्याच्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे; तर चिन्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मारामारीच्या गुन्ह्यात चिन्या वर्षभर कळंबा कारागृहात होता. 22 ऑगस्टला त्याची जामिनावर सुटका झाली होती. कारागृहातून बाहेर पडताच त्याने पुन्हा दहशत माजवण्यास सुरुवात केली होती.

महिलेची चिन्याविरुद्ध फिर्याद

शनिवारी सायंकाळी सातला त्याने काही महिलांना शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखविला होता. रात्री उशिरा त्याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होत असतानाच त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समजल्याचे पोलिस निरीक्षक ओमासे, सहायक निरीक्षक भगवान शिंदे यांनी सांगितले.

संशयिताच्या नातेवाईकांचा अधिकार्‍यांना गराडा, रास्ता रोको

चिन्या हळदकर खूनप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी मध्यरात्री ठिकठिकाणी छापे घालून धरपकड सुरू केली. पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच संशयितांच्या नातेवाईकांसह दौलतनगर परिसरातील महिलांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली. ताब्यात घेतलेल्या तरुणांच्या सुटकेच्या मागणीसाठी काही काळ रास्ता रोकोही केला. तणावपूर्ण स्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा फौजफाटा पाचारण करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT