Latest

Diwali Festival : जाणून घ्या, अभ्यंग स्नानाचा मुहूर्त ‘उद्या’ किती वाजता आहे?

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali Festival : कोरोनानंतर प्रथमच दिवाळी उत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होणार आहे. 21 ऑक्टोबरला वसुबारस पूजनाने दीपोत्वसवाला सुरुवात झाली आहे. यंदा धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी दोघांच्याही तिथी सायंकाळपासून दुस-या दिवशीच्या सायंकाळपर्यंत आल्या आहेत. त्यातच धनत्रयोदशी पंचागानुसार काही शहरात 22 ऑक्टोबरला तर काही शहरात 23 ऑक्टोबरला आली आहे. त्यामुळे धनत्रयोदशीनंतर येणारा तिसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशीची तारीख आणि तिथी दोन वेगवेगळ्या दिवशी येत आहे. त्यामुळे अभ्यंगस्नान नेमके केव्हा करावे याविषयी अनेकांचा गोंधळ उडाला आहे.

यंदा धनत्रयोदशी 22 आणि 23 ऑक्टोबला विभागून आल्यामुळे नरक चतुर्दशीची तिथी ही 23 आणि 24 ऑक्टोबरला विभागून आली आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की ज्या शहरांमध्ये 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशीची तिथी ग्राह्य धरली गेली त्यांनी नरक चतुर्दशीचे अभ्यंग स्नान 23 ऑक्टोबरला करावे की 24 ऑक्टोबरला. कोणती तिथी ग्राह्य धरायला हवी.

Diwali Festival : पंचांगानुसार धनत्रयोदशी जरी काही शहरात 22 ऑक्टोबरला आणि काही शहरात 23 ऑक्टोबरला आली असली तरी नरक चतुर्दशीच्या तिथीचा प्रारंभ 23 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी होत आहे. तर तिथीचे समापन 24 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी होत आहे. दोन दिवस तिथी आल्यास जी तिथी सूर्याने पाहिली किंवा ज्या दिवशी सूर्योदयात तिथी आहे. ती तिथी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे नरकचतुर्दशी ही 24 ऑक्टोबरला ग्राह्य धरली आहे. म्हणून 22 ऑक्टोबरला ज्यांनी धनत्रयोदशीचे पूजन केले त्यांनी आणि 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशीचे पूजन केले त्यांनी अशा दोन्ही शहरी भागातील लोकांनी नरक चतुर्दशीचे अभ्यंग स्नान 24 ऑक्टोबर या दिवशीच करायचे आहे.

Diwali Festival : वाचा अभ्यंग स्नानाचा मुहूर्त

24 ऑक्टोबर रोजी अभ्यंग स्नानाचा मुहूर्त – 5 वाजून 6 मिनिटे ते 6 वाजून 27 मिनिटे, असा आहे. या काळात पारंपारिक पद्धतीने मंगलमय अभ्यंग स्नान करावे.

Diwali Festival : अभ्यंग स्नान करण्यामागील आख्यायिका

द्वापरयुगात अंतसमयी महाभारत युद्धापूर्वी, भारतीतल एक बलाढ्य असूर नरकासूर याने आसपासच्या प्रदेशातील लहान राज्यांमधील राजकुमारी तसेच अन्य वेगवेगळ्या घराण्यातील 16 हजार 108 स्त्रियांना बंदीखान्यात ठेवले होते. तिथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. भगवान श्रीकृष्णांनी या अत्याचारी नरकासुराला युद्धात हरवले त्याचा वध करतेसमयी नरकासुराने भगवान श्रीकृष्णांजवळ वर मागितला की जो कोणी या दिवशी पहाटे उठून मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा मिळू नये. त्याला श्रीकृष्णांनी त्याला तसा आशीर्वाद दिला. त्यामुळे या दिवशी पहाटे सुर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान केले जाते.

Diwali Festival : अभ्यंग स्नान करण्याची पद्धत

अभ्यंग स्नानाच्या मुहूर्तापूर्वी उठून शौचकर्म उरकून घ्यावे. नंतर तिळाचे तेल लावून सर्वांगाला मालीश करावी. त्यानंतर विविध सुगंधी आणि औषधी गुणधर्माच्या वनस्तपतींपासून तयार केलेल्या उटण्याने स्नान करावे. याला अभ्यंग स्नान म्हणतात.

Diwali Festival : अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे

अभ्यंग स्नानाचे अनेक शारीरिक मानसिक फायदे आहेत. तिळाच्या तेलाच्या मालीशने शरीरातील स्नायू बळकट होतात. त्वचेला पोषण मिळते. सुरुकूत्या कमी होतात. शरीर पुष्ट होते. मालीशमुळे रक्ताभिसरण चांगले होते. शारीरिक आणि मानसिक मरगळ दूर होऊन ताण-तणाव थकवा दूर जातो. मन आनंदी आणि उत्साही होते. हा उत्साह दिवसभर टिकून राहतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT