Latest

डिझायनर्सची वाढती मागणी आणि बीएफए उपयोजित कला शिक्षणातून मिळणाऱ्या डिझाईन क्षेत्रातील संधी

अमृता चौगुले

डॉ. श्रुती निगुडकर

पुढारी ऑनलाईन: सर्वच व्यवसायांमध्ये चांगल्या डिझाइनरची मागणी झपाटयाने वाढत आहे. त्याला कारणे ही बरीच आहेत. डिजीटल आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने होणारी वाढ आणि योग्य डिझाईनमुळे व्यवसायांना होणारे विविध फायदे, यासह अनेक घटकांमुळे डिझाईन शिक्षणाला भारतातच नव्हे तर जगभर प्रचंड मागणी वाढत आहे.

पूर्वी इंजिनीरिंग आणि नंतर सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यावसायिक संधी मुलांना आकर्षित करत होत्या. आता मात्र डिझाईन क्षेत्र अग्रगण्य दिसत आहे. आणि ही मागणी किमान आणखी एक दशक तरी वाढतच राहील हे स्पष्ट दिसत आहे. साहजिकच डिझाईनचे शिक्षण देणारी बॅचलर ऑफ डिझाईन (B. Des) पदवी एक आकर्षण बनली आहे. परंतु डिझाईन बद्दल नीट माहिती फार कमी जणांना आहे. विशेषतः पालकांना यामधील खोलवर माहिती नाही, असे लक्ष्यात येते.

बीएफए (अप्लाइड आर्टस्) ही पदवी घेऊन डिझाईन क्षेत्रात उत्तम काम करता येते, हे सुद्धा बरेच जणांना माहिती नाही. किंबहुना ही पदवीच मुळात अनेक जणांना माहिती नाही. कम्युनिकेशन डिझाईन क्षेत्रात काम करत असताना मल्टि डिसिप्लिनरी अप्रोच महत्वाचा आहे. एकीकडे सायंटिफिक दृष्टी (वैज्ञानिक दृष्टिकोन) तर दुसरीकडे सर्जनशील विचार, या दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच मुख्यतः व्हिज्युअल डिझाइनमध्ये काम करताना कला वाणिज्य किंवा विज्ञान या तीनही क्षेत्रातून आलेला विद्यार्थी स्वतः साठी करिअर घडवू शकतो.

आजच्या आधुनिक जगात अनेक उत्तमोत्तम व्यावसायिक संधी तरुणांसमोर उपलब्ध आहेत. त्यातच सतत बदलणारे व्यावसायिक लँडस्केप पाहता दर काही वर्षांनी नवीन तंत्रज्ञानाचा उदय होत असताना, विद्यार्थ्यांनी खरंतर अशा पदव्यांचा विचार केला पाहिजे, जिथे विद्यार्थ्यांचे छंद त्यांच्या व्यावसायिक यशात बाधा न करता त्याला मजबूत जोड देऊ शकतील.

BFA (Applied Arts) बीएफए (अप्लाइड आर्ट्स) अशीच एक पदवी आहे कि, जी तुमच्या आवडीच्या छंदाला तुमच्या व्यवसायातील एल भक्कम पाया बनवू शकते. एक उत्कृष्ट पदवी कि, जी डाव्या आणि उजव्या मेंदूच्या कार्यांना अखंडपणे एकत्र करते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना चित्रकला, नृत्य, संगीत आणि लेखनाची त्यांची आवड जोपासून त्यातून उत्तम व्यावसायिक संधी मिळू शकते. तसेच कलेबरोबर सर्जनशील विचार, तार्किक विश्लेषण आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये ही शिकता येतात.

ते कसे हे समजून घेण्यासाठी आधी व्हिज्युअल डिझाइनमधून निर्माण होणारी कार्यक्षेत्रे पाहणे गरजेचे आहे. युजर एक्सपेरियन्स डिझाईन, युजर इंटरफेस डिझाईन, इ लर्निंग, ब्रेडिंग, पॅकेजिंग, वेब डिझाइन, अॅनिमेशन, पब्लिकेशन या सारखा क्षेत्रांमध्ये व्हिज्युअल डिझाइनमधून करियर करता येते

बीएफए (अप्लाइड आर्टस्) मध्ये कलेचा वापर हा छंद किंवा निव्वळ आनंदासाठी न करता एखाद्या व्यावसायिक उपयोगाकरिता केला जातो. त्यामुळे, कला-तत्त्वे आणि सौंदर्यशास्त्र शिकण्याव्यतिरिक्त भारतातील उपयोजित कला विभाग, या बहुविद्या शाखीय पदवीमध्ये विशेषतः, विद्यार्थ्यांना संपूर्ण ब्रेडिंग, पॅकेजिंग आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनच्या इतर प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. एखादी वस्तू वापरणाऱ्याचा किंवा ग्राहकाचा विचार हा सर्वप्रथम शिकवला जातो. समस्या सोडवण्याची वृत्ती तसेच शाश्वत दृष्टिकोन हा उपयोजित कलेचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे विद्यार्थी दृक -कले बरोबर एखाद्या प्रकल्पसाठी लागणारे धोरण, भाषा, अनुभूती इत्यादी गोष्टींचा विचार करायला शिकतो.

अनुभवातून शिक्षण ही उपयोजित कलेची एक विशेषता आहे. विशेष म्हणजे यात जवळ जवळ ७० टक्के शिक्षण प्रकल्पातून होते. एखादी गोष्ट करून, त्यातून शिकण्यावर भर दिला जातो आणि उद्योगक्षेत्रात लागणाऱ्या कौशल्यासाठी ही पदवी विद्यार्थ्यांना तयार करते.

डिझाईनचा विचार करत असताना पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्हिज्युअल आर्टस् बीएफए (उपयोजित कला) पदवी हा एक उत्तम पर्याय म्हणून विचार करायला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच ठिकाणी बीएफए चे वार्षिक शुल्क तुलनात्मक दृष्ट्या बाकी डिजाईन पदव्यांपेक्षा कमी आहे. परंतु, अनेकांना या पदवीची माहितीच नसल्यामुळे फायदा घेता येत नाही. ही पदवी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना चांगले विद्यापीठ बघणे मात्र आवश्यक आहे. कारण पदवीची गुणवत्ता ही पदवीच्या अभ्यासक्रमाबरोबर अध्यापकांच्या गुणवत्तेवर आणि विद्यापीठातील सुविधांवर नक्कीच अवलंबून असते.

(लेखिका या व्हिज्युअल आर्टस् स्कुल ऑफ डिझाईन, एमआयटीच्या विभाग प्रमुख आहेत)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT