Latest

IPL 2024 KKR vs SRH : 24.75 कोटी वाया… स्टार्कने टाकले IPL 2024 मधील सर्वात महागडे षटक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 KKR vs SRH : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचा पहिला सामना जिंकला असला तरी गोलंदाज मिचेल स्टार्कने या संघाची चिंता वाढवली आहे. केकेआरने आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात 24.75 कोटी रुपये खर्च करून स्टार्कला आपल्या संघात समाविष्ट केले. यासह, स्टार्क केवळ आयपीएल 2024 मधीलच नव्हे तर स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. लिलावात त्यांच्यासाठी एकूण 99 बोली लावण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये शाहरूख खानच्या केकेआरने शेवटची बोली लावून जिंकला. मात्र, हंगामातील पहिला सामना या वेगवान गोलंदाजासाठी अत्यंत निराशाजनक ठरला.

शनिवारी (दि. 23) आयपीएल 2024 चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगलेला हाय स्कोअरींग सामना केकेआरने 4 धावांनी जिंकला. खरेतर हा सामना केकेआर एकहाती जिंकेल अशीच परिस्थिती होती. पण सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या 19व्या षटकात असे काही पाहायला मिळाले, ज्याची कदाचित कोणालाच अपेक्षा नव्हती. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या स्टार्कने हे षटक फेकले, ज्यात चार षटकार मारण्यात आलेले आणि सामन्याने वेगळे वळण घेतले. स्टार्कने आयपीएल 2024 मधील सर्वात महागडे षटक तर टाकलेच पण त्याने चार षटकांत एकूण 53 धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला एकही विकेट मिळाली नाही.

स्टार्कने डावातील 19वे षटक टाकले. हे त्याच्या कोट्यातील शेवटचे षटक होते. पहिल्या 3 षटकात स्टार्कने अनुक्रमे 12, 10 आणि 5 धावा दिल्या, मात्र शेवटच्या षटकात त्याने 26 धावा देत अर्धशतकी धावा खर्च केल्या. 19व्या षटकात स्टार्कला 4 षटकार मारले.

स्टार्कच्या एका षटकात 26 धावा

वास्तविक, मिचेल स्टार्क सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 19 वे षटक टाकण्यासाठी आला. यावेळी हैदराबादला विजयासाठी 39 धावांची गरज होती. स्टार्क अप्रतिम षटक टाकून सामना संपवेल असे वाटत होते. पण SRH पॉवर हिटर हेनरिक क्लासेन या षटकाची सुरुवात गगनचुंबी षटकाराने केली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही तर तिसरा चेंडू वाईड राहिला. यानंतर द. आफ्रिकन क्लासेनने सलग दोन चेंडूंवर 2 षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढच्या चेंडूवर क्लासेनने सिंगल धाव घेतली. त्यानंतर स्ट्राईकवर शाहबाज अहमद आला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यानेही षटकार खेचला. अशाप्रकारे हैदराबादने स्टार्कच्या एका षटकात 26 धावा चोपल्या.

असा झाला सामना

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 208 धावा केल्या. 209 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्सने 7 गड्यांच्या मोबदल्यात 204 धावा केल्या. अशाप्रकारे केकेआरने या सामन्यात केवळ 4 धावांनी निसटता विजय मिळवला.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूची अशी धुलाईल होताना पाहून सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला. स्टार्कने केकेआरची फसवणूक केल्याचे काही चाहते म्हणत आहेत, तर काहीजण केकेआरने केवळ पैशांची उधळपट्टी केल्याची टींगल करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT