Latest

KKR vs PBKS : कोलकाताविरुद्ध पंजाबचे पारडे जड

Arun Patil

मुंबई ; वृत्तसंस्था : येथील वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी आयपीएलमधील लढत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज इलेव्हन (KKR vs PBKS) यांच्यात रंगणार असून नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

आकडेवारीचा विचार केला तर आयपीएलमध्ये आतापर्यंत हे दोन्ही संघ 29 वेळा समोरासमोर आले असून त्यात 19 वेळा कोलकाताने बाजी मारली आहे. पंजाबला 10 सामन्यांत विजय मिळाला आहे. मात्र, असे असले तरी उद्याच्या सामन्यात पंजाबचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात बेंगलोर संघाला पराभूत केले असून कोलकाताला त्याच बेंगलोरकडून पराभव स्वीकारावा लागला होता. कर्णधार श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखालील कोलकाताची आघाडी फळी आणि मधली फळी अजून चाचपडत आहे. याच्या उलट पंजाबच्या संघात तगडे खेळाडू असून त्यांना उद्याच्या सामन्यात विजयाची जास्त संधी आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा या लढतीत खेळेल अशी अपेक्षा असून तसे झाले तर पंजाबची गोलंदाजी आणखी धारदार होईल. फलंदाजीचा विचार केला तर पंजबाचा कर्णधार मयंक अग्रवाल, अनुभवी शिखर धवन आणि श्रीलंकेचा तुफानी फलंदाज भानुका राजपक्षे हे तिघेही पूर्ण भरात आहेत. बेंगलोरविरुद्ध राजपक्षे याने जबरदस्त फटकेबाजी केली होती. (KKR vs PBKS)

चंदीगडचा युवा फलंदाज राज अंगद बावा याच्या कामगिरीकडेही या लढतीत सर्वांचे लक्ष असेल. पहिल्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. गोलंदाजीचा विचार केला तर पंजाबकडे अर्शदीप सिंग, संदीप शर्मा, ओडीन स्मिथ हे अव्वल गोलंदाज असून राहुल चहर व हरप्रीत ब्रार हे फिरकीपटू सध्या चांगला मारा करत आहेत.

कोलकाताकडे नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन यांसारखे दर्जेदार फलंदाज आहेत. खेरीज उमेश यादव, टीम साऊथी हे कसलेले गोलंदाज कोलकाताकडे आहेत. मात्र, वरुण चक्रवर्ती याला सूर गवसलेला नसून कोलकातासाठी ही बाब डोकेदुखी ठरू शकते. अर्थात, प्रत्यक्ष मैदानात कोणता संघ कसा खेळतो यावरच सगळे काही अवलंबून असेल.

कोलकाता नाईट रायडर्स – आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरिन, पॅट कमिन्स, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकूल रॉय, रसिक दार, बाबा इंद्रजित, चमिका करुणारत्ने, अभिजित तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, सॅम बिलिंग्ज, एलेक्स हेल्स, टीम साऊथी, रमेश कुमार, उमेश यादव, मोहम्मद नबी, अमन खान.

पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कर्णधार), अर्शदीप सिंग, शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चाहर, शाहरूख खान, हरप्रीत ब्रार, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, वृत्तीक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT