Latest

…हा तर देवेंद्र फडणवीस यांचा नवीन जुमला: किशोर तिवारी

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराट्रातील ३१ लोकसभा मतदार संघात पराभव दिसत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता सुरु असताना घोषीत केलेली कापूस सोयाबीन भावांतर योजना हा एक जुमला आहे, असा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

ज्या मोदी सरकारने मध्यप्रदेश राज्यातील भावांतर योजना म्हणजे हमी भाव व बाजार भाव यातील फरक देण्याची योजना जबरीने बंद पाडली. ती भावांतर योजना मोदी सरकार आल्यास कशी काय सुरु ठेवणार, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जोपर्यंत ३१ मतदार लोकसभा संघातील शेतकरी मोदी यांचा शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध ईव्हीएमद्वारे दाखविणार नाही. तोपर्यन्त केंद्राचे गुलाम राज्यात शेतकऱ्यांच्या वेदना समजत नाही, असे स्पष्ट मत तिवारी यांनी व्यक्त केले.

नगदी पिकांवर मागील तीन वर्षात बाजार भावात आलेली घट त्यामुळे झालेला प्रचंड तोटा तसेच लागवडीच्या खर्चात आलेली प्रचंड वाढ, उत्पादन आलेली घट, आरोग्य व शिक्षणावर झालेली प्रचंड वाढ तसेच व्यावसायिक शिक्षण घेऊन ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात या १० वर्षात निर्माण झालेली बेरोजगारांची फौज यामुळे शेतकरी शेतमजूर भाजपवर प्रचंड प्रमाणात नाराज आहेत.

मार्च २०१४ पासून मार्च २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील या पट्टयात ३२८४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मूळप्रश्न बियांचे नवीन जाती, नवीन तंत्र तसेच लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांना सरकारी बँकांकडून वेळेवर मुबलक पीक कर्ज, लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा देणारा हमीभाव, पीक पद्धतीमध्ये डाळ पीक, कडधान्य, तेल बियांचे पेरा यावर लागवडीसाठी विशेष अनुदान, गाव स्तरावर प्रक्रिया तंत्र, शेतकरी उत्पादक संघाचे जाळे, ग्रामीण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी यावर मागील १० वर्षात कोणतेच ठोस काम न केल्यामुळे तसेच येणाऱ्या पंच वार्षिकमध्ये सुद्धा या कृषी संकटाच्या मूळ प्रश्नावर भाजप संकल्प पत्रात कोणतीही चर्चा नसल्यामुळे भाजपवर प्रचंड प्रमाणात नाराजी असल्याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले.

याउलट काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये हमीभाव हा घटनात्मक अधिकार, सर्व शेतकऱ्यांवरील संपूर्ण पीक कर्ज माफ, आदीवासी शेतकऱ्यांना एका वर्षात पट्टे, बेरोजगारांना वार्षिक १ लाख रुपये तसेच कुटुंबातील एका महिलेला वार्षिक १ लाख रुपये, दवाखान्यासाठी २५ लाख रुपये तसेच रोजगार हमी योजनेची मजुरी ४०० रुपये रोज करण्याची घोषणा केल्याने काँग्रेसला चांगले दिवस महाराष्ट्रातील शेतकरी आणतील, असा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT