Latest

आपण बोलून निघून जायचं… किशोर कदम यांची कविता व्हायरल

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणासंबंधी  मंगळवारी (दि.१२) बैठक घेतली होती.  यानंतर पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच हे तिघे बोलत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हायरल व्हिडिओवर किशोर कदम यांची 'आपण बोलून निघून जायचं ..' ही कविता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

किशोर कदम यांची साेशल मीडियावर व्हायरल हाेत असलेली कविता

आपण बोलून निघून जायचं ..

होईल जनतेचं जे व्हायचं
आपल्याला काय..
आपण बोलुन निघुन जायचं…
आपल्याला काय..

केवढी जनता असते समोर
आपल्या जीवाला नस्ता घोर
सगळेच पक्ष लावतात जोर
कोण साधून् कोण चोर

आपली तशीच विचारधारा
जिकडे जसा वाहिल वारा
घालत राहायच्या येरझारा
जातोच निसटुन हातुन पारा
हेच लक्षण लक्षात ठेऊन
आपण येत जात ऱ्हायचं
तहाने सारखं व्याकुळ व्हायचं

जकडे झरा तिथलं प्यायचं
आपल्याला काय…
आपण पिउन निघुन जायचं
आपल्याला काय…

लोकांची पण सहनशक्ती
आपण ताणुन बघत नुस्ती
लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती
कैसा गांव कैसी बस्ती

आपलेच सगळे कार्यकर्ते
आपले कर्ते आपले धर्ते
जिधर घुमाव उधर फिरते
त्यांच्या हातात काय उरते
उद्या परवा विचार करू
नंतर त्यांना काय द्यायचं
आधी बघू काय खायचं

लोकशाहीचंच गाणं गायचं
आपल्याला काय..
आपण गाउन निघुन जायचं
आपल्याला काय..

चोविस तास बातम्या मिळोत
चॅनल्स जाहिराती गिळोत
न्याय अन्यायाशी पिळोत
एफबी इन्स्टा सारे फळोत

खड्डे सगळे तसेच सडोत
निकाल लांबणीवरती पडोत
नशिबाशी कामं अडोत
नको तशा घटना घडोत
जे जे हवं ते ते द्यायचं
तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं

कशालाही नाही भ्यायचं
आपल्याला काय..
वचनं देउन निघुन जायचं
आपल्याला काय..

रोज लोकां समोर यायचं
रोज लोकां समोर जायचं
माईक बंद चालू असो
आपण फक्तं बोलत ऱ्हायचं

आपल्याला काय ..

व्हायरल व्हिडिओवर मुख्‍यमंत्री शिंदेंनी केला होता खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या X खात्यावर स्पष्टीकरण देत म्हटलं होते की, "माईकवरील संवाद 'सोशल मीडिया'वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे,"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT