Latest

Maharashtra Politics : अलविदा मनसे! भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना धक्का; किर्तीकुमार शिंदेंचा राजीनामा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी गुढीपाडवा मेळाव्यात केली. भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरेंची बाजू सत्याची नसल्याचे सांगत मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी आपला राजीनामा दिला आहे. (Maharashtra Politics)

किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करून राजीनामा देत असल्याची माहीत देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपचं हिंदूत्व लोकांना मान्यच होऊ शकत नाही. राज ठाकरेंची भूमिका बदलल्यानं कार्यकर्त्यांची कुचंबना होत आहे. त्यांच्या भूमिकेचा मराठी माणसाला कोणताही लाभ होत नाही, असे शिंदे यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : राजकीय भूमिकांचं एक 'अनाकलनीय' वर्तुळ पूर्ण

"महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे" अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक 'अनाकलनीय' वर्तुळ पूर्ण झाल्याचे किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

"पाच वर्षांपूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- 'लाव रे तो व्हिडिओ' सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते, त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?," असा सवाल करत शिंदे यांनी खंत व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंची बाजू सत्याची नाही

"गेल्या १० वर्षांत त्यातही विशेष करून मागच्या ५ वर्षांत 'भामोशा'ने देशाचं अक्षरशः वाटोळं केलं आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन 'भामोशा' अपारदर्शक हुकूमशाहीने दडपशाही करत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून भाजपेतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचे शुद्धीकरण करून त्यांचे 'भामोशा'मध्ये सक्तीने पक्षांतर करवून घेतले जात आहे. 'भामोशा'चे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू, आणि 'भामोशा'च्या विरोधात आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू! या नव्या समीकरणामुळे जातपातधर्माच्या नावाखाली माणसाला माणूसपणापासून तोडण्याचे काम सुरू आहे. अत्यंत नम्रपणे सांगतो की, प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तके प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला 'भामोशा'चं असलं राष्ट्रीयत्व- 'हिंदुत्व' मान्यच होऊ शकत नाही. राजसाहेब ठाकरे यांनी 'भामोशा'ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही," असेही त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics : मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा

"खरं तर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते. पण ते शक्य नाही! त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करतो. राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी मला नेहमीच प्रेमाने आणि उचित सन्मानाने वागवलं. त्यांच्यामुळे मला अनेक चांगल्या विषयांवर काम करता आलं. मनसे सोडण्याच्या माझ्या या भूमिकेचा- कृतीचा कुठल्यातरी उथळ गोष्टीशी बादरायण संबंध जोडून उठवळ राजकारणाचा धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, ही अपेक्षा," असे शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT