पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय (King Charles-III) यांचा शाही राज्याभिषेक सोहळा आज (दि.६) लंडनमधील वेस्टमिन्स्टर ॲबे येथे थाटामाटात संपन्न झाला. ब्रिटनच्या लोकांवर 'न्याय आणि दयाळूपणाने' राज्य करण्याची आणि सर्व धर्म आणि विश्वासांचे लोक मुक्तपणे जगू शकतील अशा वातावरणाचा प्रचार करण्याची शपथ किंग चार्ल्स यांनी घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याला देश-विदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनीही पुणेरी पगडी आणि वारकरी संप्रदायामध्ये घेत असलेले उपरणे (शाल) भेटवस्तू पाठवल्या आहेत.
राजा-राणी बकिंगहॅम पॅलेसमधून ब्लॅक डायमंड ज्युबिली स्टेट कोच या स्वर्णवलयांकित (सोन्याचा मुलामा असलेल्या) रथात बसून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे पोहोचल्या. कँटरबरीचे मुख्य बिशप जस्टिन वेल्बी यांनी पौराहित्य केले. राजाला सेंट एडवर्डचा मुकुट घालण्यात आला. त्याची फ्रेम 2.2 किलो सोन्याने बनवली आहे. त्यात नीलम, गार्नेट, पुष्कराज यांसह अनेक मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. (Kohinoor Diamond)
किंग चार्ल्स यांच्या शाही राज्याभिषेकाला अभिनेत्री सोनम कपूर उपस्थित होती. या सोहळ्यात उपस्थित राहून सहभागी होणारी सोनम कपूर ही एकमेव भारतीय सेलिब्रिटी असणार आहे. त्या व्यतिरिक्त भारत सरकारच्या वतीने उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ५ मे आणि ६ मे रोजी राजा चार्ल्स तिसरा यांच्या राज्याभिषेकाला उपस्थित राहिले आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष या ऐतिहासिक राज्याभिषेक साेहळ्याकडे वेधले हाेते.
किंग चार्ल्सच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी कॅमिलाच्या पोशाखांपैकी एक ड्रेस पश्चिम बंगालमधील डिझायनर प्रियांका मल्लिकने यांनी डिझाइन केला आहे. कोलकाताजवळील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथील रहिवासी असलेल्या प्रियांका यांचे आभार मानणारे पत्र कॅमिला यांनी पाठवले हाेते. प्रियांकाने बनवलेला ड्रेस राणी कॅमिला यांना आवडला आहे. त्याबदद्ल प्रियांकाचे त्यांनी आभार मानले आहेत.