Latest

जमिनीसाठी चुलत्याचा खून करुन मुंडके घेऊन पुतण्या पसार; माढा तालुक्यात अंगाचा थरकाप उडविणारी घटना

backup backup

टेंभुर्णी; पुढारी वृत्तसेवा : माढा तालुक्यातील शेवरे येथे जमिनीच्या तुकड्यासाठी चुलत्याचा कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. मुंडके धडावेगळे केल्याची अंगाचा थरकाप उडविणाऱ्या भयंकर घटनेने परिसर हादरून गेला. ही खळबळजनक घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मारेकरी हा मुंडके घेऊन पसार झाला असून पोलिस पथक त्याचा शोध घेत आहे. शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५ रा.शेवरे जि.सोलापूर) असे खून झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मयताचा नातू नरहरी नवनाथ बंडलकर (वय २३ रा.कुरण वस्ती-शेवरे,ता.माढा) याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीप्रमाणे अधिक माहिती अशी की, फिर्यादीचे मयत आजोबा शंकर प्रल्हाद जाधव व आरोपी शिवाजी बाबासाहेब जाधव यांच्यात शेताच्या कारणावरून सतत वाद होत होता. दोन वर्षांपूर्वी माढा कोर्टात दावाही दाखल केला आहे. घटनेवेळी मयत शंकर जाधव (वय ६५) हे डोळ्यांचे ऑपरेशन केल्याने घरात झोपून होते. आज (दि. ११) सकाळी घरातील इतर सर्वजण शेतात गेले होते. यावेळी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पुतण्या शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, अजित बाबासाहेब जाधव व आकाश बाबासाहेब जाधव (सर्व रा. कुरण वस्ती शेवरे, ता. माढा) हे शंकर जाधव यांच्या घरात घुसले.

यावेळी शिवाजी जाधव याने कुऱ्हाडीने शंकर जाधव यांच्या गळ्यावर वार करून त्यांचे मुंडके शरीरावेगळे केले. खून करुन शिवाजी जाधवने त्यांचे मुंडके घेऊन पलायन केले. हे मुंडके घेऊन शिवाजी याला जाताना फिर्यादी नरहरी बंडलकर याने पाहिले होते. त्याने लगेच अमोल शंकर जाधव यांना फोन करून तुम्ही सर्वजण लगेच घरी या असे सांगितले अशी फिर्याद नरहरी बंडलकर याने दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित जाधव व टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील सपोनि गिरीष जोग व इतर अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील सर्व आरोपी फरार झाले आहेत.सपोनि गिरीश जोग हे अधिक तपास करीत आहेत.या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुंडके १५ कि.मी. घेऊन आरोपीने मोटारसायकलवरून संगम ते अकलूज असा प्रवास केला. मात्र पोलिसांच्या भीतीने आरोपीने अकलूज परिसरात एका शेतात मुंडके फेकून देऊन पलायन केले. पोलिसांना माहिती मिळताच तेथे जाऊन ते ताब्यात घेतले.

SCROLL FOR NEXT