Latest

स्व. खाशाबा जाधवांचा इतिहास बायोपिकवर; २०२४ च्या ऑलिम्पिकनंतर होणार प्रदर्शित

दिनेश चोरगे

सातारा :  स्व. खाशाबा जाधव नावाच्या सातार्‍याच्या सुपुत्राने 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. या मराठमोळ्या कुस्तीपटूने भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक (कांस्य) जिंकून देण्याचा भीम पराक्रम केला. अलीकडच्या काळात अनेक खेळ किंवा खेळाडूंवर चित्रपट आले; पण दुर्दैवाने देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिकपदक जिंकून देणारे स्व. खाशाबा जाधव काहीसे दुर्लक्षित राहिले. मात्र, आता मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले नागराज मंजुळे यांनी खाशाबांवर चित्रपट तयार करण्यासाठी शड्डू ठोकला आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकनंतर खाशाबांचा बायोपिक पडद्यावर झळकणार आहे.

स्व. खाशाबा जाधव 1952 मध्ये झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होते. जाधव यांनी आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मैदान मारताना कांस्यपदक मिळवले. वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. खाशाबा जाधव यांचा जन्म दि. 15 जानेवारी 1926 रोजी कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे झाला तर 14 ऑगस्ट 1984 मध्ये निधन झाले. निधनानंतर तब्बल 16 वर्षांनी त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देण्यात आला. गेली 14 वर्षे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळावा यासाठी लढा सुरू आहे. 2010 मध्ये दिल्लीत स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने भव्य स्टेडियम उभारले गेले. त्याचवेळीस खाशाबांना पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त झाला पाहिजे, असा निर्धार मुलगा रणजित जाधव यांनी उद्घाटनावेळी केला. देशात अनेक खेळाडूंवर मराठी, हिंदीमध्ये चित्रपट प्रदर्शित झाले. स्व. खाशाबा जाधव यांच्या बायोपिक तयार करण्याचा मानस नागराज मंजुळे यांनी केला. नागराज मंजुळे सध्या फक्त खाशाबामय आणि कुस्तीमय झाले आहेत. जिओ स्टुडिओज् आणि आटपाटनिर्मित खाशाबा जाधव यांच्या बायोपिकसाठी सर्वस्व त्यांनी पणाला लावले आहे. ज्याला मराठी समजत नाही, त्यालाही हा खाशाबांचा चित्रपट समजेल. अशा ताकदीचा सिनेमा तयार केला जाणार आहे. नागराज मंजुळेंनी पटकथा तयार केली आहे. ही पटकथा लिहित असताना खाशाबांसारख्या महान खेळाडूवर तर कधीच चित्रपट व्हायला हवा होता, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. माझे वडील आणि भाऊ भारत हे चांगले कुस्तीपटू होते. त्यामुळे लहानपणापासूनच या मर्दानी खेळाशी तशी माझी नाळ जोडली गेलेली असल्याचे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले आहे.

अखेरच्या श्वासापर्यंत कुस्ती जगलेला… तांबड्या मातीत घाम गाळलेला…अन् भारताच्या वैभवशाली कुस्ती परंपरेला ऑलिम्पिकच्या नकाशावर गौरव मिळवून देणार्‍या खर्‍या मराठमोळ्या हिरोची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून जगापुढे येणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन तर करणारच आहे; मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च क्रीडा महोत्सवात देशाचा तिरंगा आकाशात फडकवणार्‍या मल्लाची खरी ओळख यानिमित्ताने लोकांपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्राचे भूषण आणि देशाचा गौरव असलेल्या दुर्लक्षित खाशाबा जाधव नावाच्या व्यक्तिमत्त्वाची जगाला खरी ओळख या बायोपिकने होणार आहे.

चित्रपटात दिसणार मातीतली मुले…

स्व. खाशाबा जाधव या मराठमोळ्या कुस्तीपटूवर बायोपिक बनवण्याचे शिवधनुष्य नागराज मंजुळे यांनी आता उचलले आहे. या चित्रपटाचे ऑडिशन लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटासाठी मातीतल्या मुलांची गरज आहे. आगामी वर्षी होणार्‍या पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत 'खाशाबा' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन होणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर क्रीडा रसिकांमधील ऑलिम्पिकची झिंग उतरण्यापूर्वीच हा बहुचर्चित सिनेमा पडद्यावर झळकणार आहे.

SCROLL FOR NEXT